मुंबई- काँग्रेस च्या वर्तनाने देशाचे २० लाख कोटींचे नुकसान झाले असून विकासकामे होवू द्यायचीच नाहीत या काँग्रेस च्या नीतीला विरोध करण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभरात १६ तारखेला निषेध आणि निदर्शने करण्यात येतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी जाहीर केले आहे
त्यांनी असे म्हटले आहे कि , संसदेच्या कामात गतिरोध निर्माण करण्याच्या काँग्रेसच्या लोकशाहीवर आघात करणार्या प्रकाराची करावी तितकी निंदा कमी आहे. केवळ जीएसटी विधेयक पारित होऊ नये, यासाठी ठरवून हा प्रकार करण्यात आला. संसद अधिवेशन चालूच द्यायचे नाही, हा जणू चंगच त्यांनी बांधला होता. या प्रकारामुळे देशाचे दोन लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले, तर महाराष्ट्राचे 20 हजार कोटींचे. जीएसटी महाराष्ट्रासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. मला आशा आहे की, जीएसटीसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात येईल. केंद्र आणि महाराष्ट्रातील सरकार तरूणांसाठी रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करीत असताना काँग्रेस ज्या पद्धतीने अडथळे आणू पाहत आहे, ते पाहता या देशातील आणि महाराष्ट्रातील तरुण काँग्रेसला कधीही क्षमा करणार नाही. आज काँग्रेस पूर्णपणे नैराश्येत आहे. त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीत. पुरावे नसताना ते आरोप करीत आहेत आणि राज्यातील नेत्यांच्या विषयांवर संसदेत बोलत आहेत. त्यामुळे या प्रकाराचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. याविरोधात येत्या 16 तारखेला राज्यभरात निषेध-निदर्शने करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. याशिवाय, प्रत्येक मतदारसंघात जाऊन काँग्रेस विकासात आणत असलेल्या अडचणींविरोधात जनजागृतीही करण्यात येईल.