औरंगाबाद – नांदेड- मनमाड धावत्या पॅसेंजर रेल्वेगाडीला औरंगाबाद – दौलताबाद रेल्वेस्थानकांदरम्यान आग लागली. अचानक लागलेल्या आगीने खळबळ उडाली. अग्निशामक दलाची मदत तातडीने पोचल्याने आग विझवण्यात यश आले, यात एक डबा जळून खाक झाला. एक जोडपे किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली.
प्राथमिक माहितीनुसार असे समजते कि , नांदेड मनमाड पॅसेंजर रेल्वेगाडी (गाडी क्र. 57542) ही रविवारी पहाटे दीडच्या सुमारास औरंगाबाद रेल्वेस्थानकात आली. पाच मिनिटे स्थानकात थांबून ती मनमाडच्या दिशेने रवाना झाली, त्यानंतर अवघ्या पाचच मिनिटांत मिटमिटा गावानजिक आगीची ही दुर्घटना घडली. गाडीने वेग घेतलेला असतानाच पाठीमागून तिसऱ्या क्रमांकाच्या डब्यात, दोन डब्यांच्या जोडामधून खालच्या बाजूने धूर निघत असल्याचे काही प्रवाशांच्या लक्षात आले. त्यानंतर लगेचच खिडकीच्या बाजूने आगीचे लोळ दिसू लागल्याने प्रवाशांनी साखळी ओढली, त्यानंतर जवळपास एक किलोमीटर अंतरावर रेल्वेगाडी थांबली. आग लागल्याचे समजल्यानंतर प्रवाशांत खळबळ उडाली, प्रवाशांचा आरडाओरडा सुरु झाला, गाडीचा वेग कमी होताच अनेक प्रवाशांनी उड्या घेतल्या.
गाडी थांबल्यानंतर मध्यरात्रीचा अंधार आणि रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूने झाडी, यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. महिला व लहान मुले जिवाच्या आकांताने ओरडत होती. त्यावेळी काही प्रवाशांनी महिला व मुलांना हाताला धरुन ओढत बाहेर काढले. गाडीला आग लागल्याची माहिती चालकाने औरंगाबाद नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर औरंगाबादचे स्टेशमास्तर डी. पी. मीना यांच्यामार्फत अग्निशामक दल व पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती पोचविण्यात आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परतेने पोचून तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. अग्निशामक दल वेळेवर दलाच्या तत्परतेने दुसऱ्या डब्याला आगीपासून वाचवण्यात यश आले. गाडी नंतर दौलताबाद रेल्वेस्थानकात नेण्यात आली.