मुंबई –सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून , मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही क्षेत्रांत मानाचे स्थान असलेल्या ‘कोहिनूर मटा सन्मान’ सोहळ्यात शनिवारी’एलिझाबेथ एकादशी’ ने तर सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून ‘वाडा चिरेबंदी’ यांनी बाजी मारली टीव्ही विभागात ‘गंध फुलांचा गेला सांगून’ ही मालिका अव्वल ठरली. अंधेरीच्या ‘द ललित’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा दिमाखदार सोहळा रंगला.
सलाम पुणे , झी गौरव , आणि मटा सन्मान’ पुरस्कार मिळवणाऱ्या एलिझाबेथ ला वारकरी संघटनेच्या तहकाठीत पदाधिकाऱ्यांनी विरोध करून हा चित्रपट प्रदर्शित होवू न देण्याची धमकी दिली होती त्यानंतरही हा चित्रपट दिमाखात प्रदर्शित झाला आणि रसिकांनी हि त्याला भरभरून दाद दिली
‘एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन लिमिटेड’ आणि ‘मयसभा’ची निर्मिती असलेल्या ‘एलिझाबेथ एकादशी’ने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन अशा पाच विभागांत बाजी मारली. ‘तप्तपदी’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट गीत, सर्वोत्कृष्ट संगीत आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका असे सन्मान पटकावले; तर ‘लोकमान्य…एक युगपुरुष’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (शंकर महादेवन), छायाचित्रण (प्रसाद भेंडे) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता (सुबोध भावे) हे पुरस्कार देण्यात आले.नाटक विभागात ‘अष्टविनायक’ आणि ‘जिगीषा’ची निर्मिती असलेल्या ‘वाडा चिरेबंदी’ने सर्वोत्कृष्ट नाटक आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या पुरस्कारांवर मोहोर उमटवली. ‘सर्किट हाऊस’ या नाटकाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (विजय केंकरे), सर्वोत्कृष्ट अभिनेता (संजय नार्वेकर) आणि सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिका (भूषण कडू) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तसेच विजया प्रॉडक्शन्सच्या ‘वानरायण’ या नाटकाला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकाच्या सन्मानाने गौरवण्यात आले.
‘गंध फुलांचा गेला सांगून’ या ‘सेवेन्थ सेन्स मीडिया’निर्मित मालिकेने टीव्ही विभागात सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (धनश्री काडगांवकर), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (मयूर खांडगे), सहाय्यक अभिनेत्री (भक्ती देसाई), सर्वोत्कृष्ट संकलन (असीम अहमद, रूपेश गमरे) अशा पाच पुरस्कारांवर आपली नाममुद्रा उमटवली. तसेच ‘दुर्वा’ या मालिकेने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन (दीपक नलावडे) आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रण (अशोक पवार) हे पुरस्कार मिळवले.’कोहिनूर मटा सन्मान २०१५’ सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेत्री समिरा गुर्जर आणि मधुरा वेलणकर यांनी केले.