पुणे : उद्या राज ठाकरे हे पुण्यात हेल्मेटच्या सक्तीला विरोध करतील आणि याबाबत आंदोलनाची घोषणा करतील अशी अनेक मनसे कार्यकर्त्यांची भावना झाली आहे कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर करण्याबरोबरच पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी जातीने पुढाकार घेतला. त्यासाठी उद्या दिनांक . १८ पासून ते शहराच्या आठही मतदारसंघांतील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी हा विषय काढण्याची अनेकांची इछ्या असल्याचे बोलले जाते
उद्या सकाळी राज ठाकरे सकाळी ९ वाजता कसबा गणपतीचे दर्शन घेतील आणि पुण्यात संवादाला प्रारंभ करतील ते २० तारखेपर्यंत पुण्यातच असतील असेही समजते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली. त्यातच गटबाजीला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर स्वतः राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरवात पुण्यापासून होणार आहे. चार दिवसांच्या दौऱ्यात एका दिवशी दोन मतदारसंघ असे आठही मतदारसंघातील गट अध्यक्ष, महिला अध्यक्ष, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना ते भेटणार आहेत. त्यासाठी वेळापत्रक तयार केले असून, या बैठकीत त्यांची बाजू ऐकून घेणार आहेत.
दरवेळेस पक्षाकडून पुण्याची जबाबदारी एका नेत्यावर देण्यात येते; परंतु नेमण्यात आलेल्या नेत्यांकडून शहर संघटनेत म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे राज यांनीच लक्ष घालण्याचे ठरविल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला. कसबा विधानसभा मतदारसंघापासून या भेटीला सुरवात होणार आहे. मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डासाठी स्वतंत्र वेळ देण्यात आला आहे. प्रत्यक्ष भेटीत साहेबांसमोर कार्यकर्ते काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे.