मुंबई, दि. २९ – पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्र्यांची अफझल खानाच्या फौजे शी , निजामशाहीशी तुलना करणारी आणि अशी अनेक वक्तव्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार काळात केलीउत त्यामुळे आता सत्तेत सोबत यायचे असल्यास आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाध्यक्ष अमित शाह यांची माफी मागा अशी अट भाजपातर्फे उद्धव ठाकरेंसमोर ठेवण्यात येणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.यामुळे खळबळ उडाली आहे
राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाने मंगळवारी भाजपा विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करत राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावाही केला. मात्र या सर्वात त्यांनी शिवसेनेला सोबत घेण्याबद्दल अवाक्षरही काढले नाही. निवडणूक प्रचारारादरम्यान भाजपाचे अनेक नेते, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तर ‘सामना’च्या अग्रलेखांतूनही भाजपावर तोफे डागत त्यांनी मोदींचा बापही काढला, या सर्व गोष्टींमुळे भाजपा नेतृत्व दुखावले गेले असून उद्धवनी जाहीररित्या किंवा वैयक्तिक पातळीवर असो पण माफी मागायलाच हवी असा पवित्रा असे भाजपा नेत्यांनी घेतला आहे.
एका केंद्रीय नेत्याच्या सांगण्यानुसार, भाजपा- शिवसेना यांची युती होईलच, पण त्यासाठी थोडा काळ लागू शकतो. पंतप्रधान आणि अमित शाह यांच्याविरोधात त्यांच्या वक्तव्यांमुळे आम्ही नाराज असून त्यांना याची जाणीव व्हायला हवी अशी आमची इच्छा आहे. या वक्तव्यांबद्दल त्यांना माफी मागावी लागेल, असे त्या नेत्याने सांगितले.
राज्यात स्वबळावर सत्ता आणण्याची भाषा करणा-या शिवसेनेचे स्वप्न पूर्ण झाले नाही, तर दुसरीकडे भाजपाने जास्त जागा जिंकत सत्तास्थापनेसाठी दावाही केला आहे. मात्र त्यात सेनेला कोठेही स्थान दिलेले दिसत नाही. त्यामुळे सत्तेत वाटा हवा असेल तर भाजपाची अट मान्य करत माफी मागण्याशिवाय सेनेकडे दुसरा पर्याय नाही. आता सेना भाजपाच्या या दबावतंत्रापुढे झुकून माफी मागेल की विरोधी पक्षात बसणे पसंत करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले असून लवकरच हे स्पष्ट होईल.