पुणे : शास्त्रीय संगीत व नृत्य यांची जोपासना करणा-या उद्गार तर्फे “डगर चलत” या शास्त्रीय नृत्याच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २६ तारखेला बाल शिक्षण मंदिर ऑडीटोरीयम, मयूर कॉलनी येथे संध्याकाळी ५.३० वाजता ही मैफिल रंगणार आहे. अशी माहिती उद्गार संस्थेच्या अध्यक्षा सौ.आसावरी पाटणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या अनोख्या मैफिलीमध्ये वयाच्या चौथ्या वर्षापासून कथक शिकणारे, जयपूर घराण्याचे राजेंद्र गंगाणी कथक नृत्य सादर करणार आहे. तसेच बनारस घराण्याचे प्रसिद्ध तबला वादक पंडित अरविंद कुमार आजाद त्यांना तबल्याला साथ देतील. या दोन्ही हरहुन्नरी कलाकारांच्या कलेचा आनंद अनुभवायची संधी एकाचवेळी पुणेकरांना मिळत आहे. उद्गार ही संस्था शास्त्रीय संगीत व नृत्य याचा प्रचार व प्रसार व्हावा या उदेशाने नेहमी कार्यरत असते. गुरु पंडिता रोहिणीताई भाटे यांच्या कलेचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या शिष्या सौ.आसावरी पाटणकर या नेहमी कार्यरत असतात. या हेतूनेच या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात एकाच वेळी दोन वेगळ्या घराण्यातील कलाकारांची कला अनुभवयास मिळणार आहे. या मैफिलीच्या प्रवेशिकांसाठी ९५४५२०८६८४ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.