सातारा (जिमाका):- राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन याचबरोबर लोकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाचे कार्य प्रशसंनीय ठरले आहे, असे गौरवोद्गार राज्याचे जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी काढले.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या कामांचा जलपूजन समारंभ पालकमंत्री शिवतारे यांच्या हस्ते आज शिंदेवाडी येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पराग सोमण, प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, जिल्हा अधीक्षक कृ षी अधिकारी जितेंद्र शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे, शिंदेवाडीच्या सरपंच अर्चना मनवे, कृषी, पाटबंधारे, महसूल विभागातील अधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
पाणी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असला तरी दुष्काळी भागातील जनतेच्या दृष्टीने याला विशेष महत्व आहे. त्यामुळे आज येथे जलपूजन करीत असताना जलदेवतेची कृपा या भागावर अशीच राहू दे, अशी कामना केल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, जलसंधारणाच्या कामाला सरकारने विशेष प्राधान्य दिले असून यामुळे दुष्काळी भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे या भागातील जनतेला दीर्घकालीन लाभ मिळणार आहे. तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करुन श्री. शिवतारे पुढे म्हणाले की, पुढील काळात जलसंधारण आयुक्तालय उभारुन या क्षेत्रातील सर्व कामे एका छत्राखाली व्हावीत या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे.
जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी शिंदेवाडी गावातील नागरिकांनी श्रमदानाच्या माध्यमातून उत्स्फूर्तपणे जलयुक्त शिवार अभियानाचे काम केल्याबद्दल गावकऱ्याचे अभिनंदन करुन पाण्याचा योग्य वापर केला तर काय घडू शकते याचं उदाहरण या गावाने सर्वांपूढे ठेवले आहे, असे सांगून यापुढेही येथे असेच एकदिलाने हे कार्य पुढे चालू ठेवले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
आमदार श्री.भोसले यांनी राज्य शासन, पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासन यांनी खोऱ्याच्या विकासासाठी आणि या भागातील जनतेच्या हितासाठी उल्लेखनीय कार्य केले जात असल्याबद्दल गौरवोद्गार काढले. याप्रसंगी ग्रामस्थांतर्फे पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, अन्य शासकीय अधिकारी आणि कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला