पुणेः आमदारांच्या घरासमोर बसून मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेल, तर त्यांनी आमच्या घरापुढे बसावं. पण आमच्या घरासमोर केले जाणारे ठिय्या आंदोलन म्हणजे केवळ ‘स्टंट’ असल्याचं वक्तव्य भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे.
शुक्रवार (दि.3) रोजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरासमोर मराठा समाजाकडून ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. यावर त्यांना विचारलं असता मेधा कुलकर्णी यांनी हे विधान केलं आहे.
शासन आपल्या पातळीवर आरक्षण देण्याचा योग्य प्रयत्न करत आहे, त्यामुळे आमदारांच्या घरासमोर आंदोलन करून काय फायदा, असा प्रश्न यावेळी कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, हे सर्व मुद्दे बौद्धिक पातळीवर आणि कायद्याच्या चौकटीत सोडवायला हवेत, आमच्या दारासमोर आंदोलन करून त्यांना आरक्षण मिळणार असेल तर त्यांनी ते करावं. मात्र, मराठा आंदोलक केवळ वेळ वाया घालवत स्टंट करत असल्याची प्रतिक्रिया आ मेधा कुलकर्णी यांनी यावेळी दिली आहे.