सातारा(जि.मा.का) : राष्ट्रीय शालेय सुरक्षा कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे देण्यात येणारे धडे हे भविष्यामध्ये समाजाला शिस्त लावणारे ठरतील. असे गौरवोद्गार अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी कढले.
राष्ट्रीय शालेय सुरक्षा कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील शिक्षकांसाठी एक दिवसीय शालेय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा येथील नियोजन भवनात घेण्यात आली यावेळी आपत्ती व्यवस्थापनाचे किट शालेय शिक्षकांना श्री.यादव यांच्या हस्ते देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रकल्प समन्वयक मिलींद वैद्य, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, तहसिलदार नेताजी कुंभारे आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री.यादव पुढे म्हणाले, विद्यार्थी दशेतच आपत्ती व्यवस्थापनाचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत ही अत्यंत चांगली बाब आहे. हाच विद्यार्थी भावी समाज आहे. या मार्गदर्शनामुळे चांगली शिस्त लागणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनामुळे शाळेतील अपघाताचे धोके निश्चितपणे कमी करता येतील तर काही ठिकाणी निश्चितपणे टाळता येणार आहेत. केंद्र शासनाच्या या पथदर्शी प्रकल्पातून देशाचे धोरण ठरेल. त्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
हे प्रशिक्षण सात टप्प्यात देण्यात आल्याचे सांगून श्री.वैद्य पुढे म्हणाले जुलै 2014 मध्ये पुण्यात तीन दिवस शिबीर घेण्यात आले होते त्यामध्ये 52 जणांना प्रशिक्षीत करण्यात आले होते. त्यानंतर प्रत्येक टप्प्यात प्रत्येक शाळेतील दोन शिक्षकांना प्रशिक्षीत करण्यात आले आहे.या प्रशिक्षणामध्ये आपत्ती कसी निर्माण होऊ शकते त्याचे व्यवस्थापन कसे करण्यात येईल त्याचबरोबर प्रशिक्षण आराखडा कसा तयार करावयाचा याबाबत मार्गदर्शन देण्यात आले आहे. आजच्या शेवटच्या टप्प्यात प्रथोमोपचार पेटी त्यामध्ये असणाऱ्या 42 घटकांची माहिती पोस्टर्स, चित्रफित,आदीच्या किटचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच त्याच्या वापराबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
श्री.ताम्हाणे यांनी स्वागत प्रास्ताविक केले ते म्हणाले सातारा जिल्हयातील सहा तालुक्यांमधील 200 शाळा निवडण्यात आल्या आहेत. या शाळांमधील 381 शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती यावर कशी मात करायची याचे प्रबोधन याचा समावेश आहे.
आजच्या या एक दिवसीय प्रशिक्षण शाळेसाठी सहा तालुक्यांमधील शिक्षक, शिक्षिका मोठया संख्येने उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापनाचे शालेय धडे समाजाला शिस्त लावणारे -प्रमोद यादव
Date:

