नवी दिल्ली – केंद्र सरकारने आत्महत्येचा प्रयत्न करणे या कृत्याला गुन्ह्याच्या श्रेणीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता आत्महत्येचा प्रयत्न करणे गुन्हा ठरणार नाही आणि त्यासाठी आता असा प्रयत्न करणार्यांना तुरुंगात जाण्याची भीती नाही.
केंद्रातील भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने आज (बुधवार) भारतीय दंड विधान कलम 309 रद्द करण्याची घोषणा केली आहे. या कायद्यानुसार आत्महत्येचा प्रयत्न करणार्यांना एक वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होत होती. सरकारच्या या निर्णयाला 18 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांचा पाठिंबा आहे.
काही दिवसांपूर्वी गृहराज्यमंत्री किरण रिजिचू यांनी लोकसभेत सांगितले होते, की लॉ कमिशनने दिलेल्या अहवालात कलम 309 रद्द करण्याची शिफारस केली आहे. कमिशनचे म्हणणे होते, की हा कायदा अमानवीय आहे. हा कायदा रद्द केला तर, आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीला कायद्याच्या कचाट्यात सापडून मानसिक ताण सहन करावा लागणार नाही. रिजिजू यांनी सांगितल्यानुसार, गृहमंत्रालय सीआरपीसी आणि आयपीसीच्या इतर काही कलमाना रद्द करण्याचा विचार करत आहे.