लोणी काळभोर :भाजप पक्ष ही अदीलशहाची टोळी आहे. त्यातले अमित शहा महाराष्ट्रात येत असल्यानेच महाराष्ट्र असुरक्षित आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
लोणी काळभोर(ता. हवेली) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ झालेल्या महिला मेळाव्यात सुळे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोक काळभोर हे होते.
पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की, अमित शहा गुजरातचे गृहमंत्री असताना तेथील न्यायालयाने अमित शहांना हद्दपार केले. त्या अमित शहांना महाराष्ट्रात महिला असुरक्षित नाहीत, असे म्हणण्याचा व राष्ट्रवादीवर टीका करण्याचा काहीही अधिकार नाही. राष्ट्रवादी पक्ष सत्तेत असताना, राष्ट्रवादी पक्षाच्या धोरणामुळेच महाराष्ट्रात बलात्कार करणार्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली. भाजप खोटा प्रचार करून जनतेची फसवणूक करत आहे. त्यांना खोटा प्रचार करून एकदा सत्ता मिळाली, मात्र महाराष्ट्राची जनता हुशार आहे.
भाजपचा खोटारडेपणा जनतेच्या ध्यानात आला आहे. हे सरकार शेतकरीविरोधी सरकार आहे. गेल्या काही महिन्यांत शेतकर्यांवर जे वाईट दिवस आले, ते केवळ भाजप सरकारमुळे आले आहेत. त्यामुळे जनता भाजपला हद्दपार करणार आहे, अशी आशा यावेळी सुळे यांनी व्यक्त केली. तसेच भाजपने महाराष्ट्रात साठ उमेदवार आयात केले आहेत. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांच्यावर महाराष्ट्रात पंचवीस सभा घेण्याची नामुष्की आली आहे.