काबुल -अफगाणिस्तानच्या संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे.संसदेच्या परिसरात चार स्फोट झाल्याची आणि गोळीबार सुरू असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक वृत्तवाहिन्यांवरून देण्यात येत आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यावेळी संसदेचे कामकाज सुरू असल्याचेही कळते. दरम्यान, अफगाणिस्तानमधील सारे खासदार सुरक्षित असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. एक हल्लेखोर संसदेच्या परिसरात घुसला असल्याचेही वृत्त आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार संसदेच्या इमारतीच्या तळभागात मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. संसदेत हजर असलेले खासदार, अधिकारी, पत्रकार यांचे संसदेबाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संसदेचे कामकाज सुरू असताना परिसरात प्रचंड सुरक्षा ठेवण्यात येते, असे असून देखील हल्लेखोर आत शिरल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संसदेच्या परिसरात काही लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. मात्र त्याची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
अफगाणिस्तानच्या संसदेवर दहशतवाद्यांचा हल्ला
Date:

