सर फाऊंडेशन ’ आयोजित परिसंवादाला चांगला प्रतिसाद
पुणे :
‘अडचणी आणि विविध मर्यादांवर मात करून गावांकडे लक्ष द्यावे,त्यासाठी आपल्या दैनंदिन जगण्यातून वेळ काढून चांगल्या प्रशिक्षणासह व्यवस्था उभारून सामाजिक ,शैक्षणिक आणि उद्योजकता विकासाचे कार्य ग्रामीण भागात सुरु करावे ’ असा सूर आज ’जगा आणि जागा ’ परिसंवादात उमटला .
‘सर फाऊंडेशन’ आणि ‘डीपर’ या संस्थांच्या वतीने जे पी नाईक एज्युकेशनल सेंटर येथे आयोजित परिसंवादाला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला.’सर फौंडेशन आणि डीपर या संस्थांनी ‘साद माणुसकीची ’ या अभियानांतर्गत हा परिसंवाद आयोजित केला होता . या परिसंवादात रविवारी दुपारी हा सूर उमटला.
या परिसंवादात ज्येष्ठ समुपदेशक डॉ. श्रीराम गीत , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन, विवेक वेलणकर, रूरल रिलेशन संस्थेचे प्रमुख, प्रदीप लोखंडे, सर फाउंडेशनचे संस्थापक हरीश बुटले,डॉ. विजय वाढई ( प्राचार्य, सिंहगड अभियांत्रिकी कॉलेज ) सहभागी झाले होते. हरीश बुटले यांनी प्रास्ताविक केले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन म्हणाले, ‘सरकारी व्यवस्था आणि स्वयंसेवी संस्था या दोन्ही व्यवस्थांमध्ये काही गुण दोष आहेत. गावाकडे समृद्धी पोहचविण्याची कल्पना चांगली असली तरी साधन संपत्ती पोहचवून चालणार नाही , तर ग्रामीण समाजाची मानसिकता बदलून त्यांना जातीय व्यवस्थेतून बाहेर काढण्याची गरज आहे’.
रूरल रिलेशन संस्थेचे प्रमुख, प्रदीप लोखंडे म्हणाले, ‘भारतात 300 माणसांमागे एक एन जि ओ आहे तरी भारत का बदलला नाही ? हा ही विचार केला पाहिजे . जग हे ग्लोबल होत चाललेलं आहे , अशा वेळी माझे गाव, माझी गल्ली याकडे फार पाहता येणार नाही तरीही गावात सामाजिक काम करताना सरकार आणि संस्था या दोन्ही व्यवस्थांना पारदर्शक आणि उत्तरदायी राहावे लागेल’.
ववेक वेलणकर म्हणाले, ‘संवादातील क्रांतीमुळे गावातून बाहेर पडलेले लोक एकत्र येत आहेत. वेळ नाही ही सबब चुकीची आहे, कारण आय पी एल पाहायला आपल्याला वेळ असतो गावातील व्यवस्थेला आपण बाहेर जाऊन सामाजिक काम केलेले चालते पण त्याच्या हितसंबंध राजकारणाला व्यवस्थेला धक्का लागलेला त्यांना चालत नाही तरीही या मर्यादा समजून घेऊन गावात काम वाढले पाहिजे’.
डॉ. श्रीराम गीत म्हणाले, ‘गावात काम करणार्या आणि कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाची गरज आहे ’.
, डॉ. विजय वाढई म्हणाले, ‘आपल्याला गावाने काय दिले या विचारापेक्षा आपण गावाला काय दिले हा प्रश्न विचाराणे महत्वाचे आहे. गावांमधील शिक्षण आणि उद्योजकता विकासाकडे लक्ष द्यायला हवे. त्यात सरकारी योजनांचा उपयोग केला पाहिजे’.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे उपस्थित होते. पहिलीपासून श्रम संस्कृती रुजवली पाहिजे. बारावी पर्यंत विद्यार्थी कौशल्य प्रशिक्षण झाले पाहिजे, असे मत गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर जिल्ह्यतील कोठारी परिसरातील आठ केंद्र शाळाना दरवर्षी एक लाख रु . पुढील पाच वर्षांपर्यंत शैक्षणिक कार्यासाठी देण्याची घोषणा हरीश बुटले यांनी केली .
राज्यातील गावातील समस्या आणि तेथून मोठे झालेले अनिवासी गावकरी यांना जोडणारी प्रणाली होत असल्याची माहिती हरीश बुटले यांनी या परिसंवादात दिली.

