मुंबई – भगवा आतंकवाद असा शब्द जन्माला घातला आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार पाडले त्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा भाजप घेणार असेल तर शिवसेना विरोधात मतदान करील, अशा रोखठोक शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी आपली भूमिका स्पष्ट केली. सत्तेसाठी आम्ही लाचार नाहीत, एकटे बसण्याची तयारी आहेे, असे सांगतानाच सत्तेत सहभागासाठी अजून दोन दिवस वाट पाहा, असे म्हणत उद्धव यांनी अजून सकारात्मक असल्याचेही दाखवून दिले.
शिवसेनेचे आमदार व खासदारांची शिवसेना भवनात बैठक झाली. या वेळी पक्षाचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. सत्तेत सहभागाबाबत उद्धव म्हणाले, विधानसभा अध्यक्ष कोणत्या पक्षाचा असेल त्यावर आमचा पाठिंबा अवलंबून असेल. अध्यक्षांचे नाव सर्वानुमते जाहीर व्हावे. तसेच देशातील हिंदूंना संपवण्याची भाषा केली जात आहे. देशविघातक शक्ती वाढत असताना हिंदुत्ववादी शक्तींचे विभाजन होऊ नये अशी शिवसेनेची भूमिका आहे. परंतु भगवा आतंकवाद म्हणणाऱ्या शरद पवार यांनी भाजपला पाठिंबा देऊ केला आहे. भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार की नाही हे स्पष्ट करावे. भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर शिवसेना विरोधात बसेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या मुद्द्यावर उद्धव म्हणाले, खुद्द शरद पवार यांनीच नेते भेटले पण कोणताही प्रस्ताव नव्हता, असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांनाच याबाबत विचारा.
अनिल देसाई मंत्रिपदाची शपथ घेणार होते; मग त्यांना विमानतळावरून परत का बोलाविले, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता उद्धव म्हणाले, की मीच अनिल देसाई यांना परत बोलाविले. जर भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार असेल तर आम्हाला सत्तेत रस नाही. आम्हीही मोकळे आहोत. लाचारी पत्करून कदापि सत्तेत जाणार नाही. मला कोणाबरोबर जायचे असेल तर मी उघड भूमिका घेईन. अटलबिहारी वाजपेयी मंत्रिमंडळात शिवसेनेचे मंत्री म्हणून सुरेश प्रभू यांनी शपथ घेतली होती. ते सरकार पुढे तेरा दिवसांनी पडले. वाजपेयींचे सरकार पवार यांनीच पाडले होते, याची आठवण करून देतानाच प्रभू हे आज भाजपचे मंत्री बनले आहेत याचे आश्चर्य वाटते.
राज्यातील भाजप सरकारमध्ये सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय 12 नोव्हेंबरला घेण्यात येईल. सोमवारपासून विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. सरकार विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. अधिवेशनात जर सत्ताधारी भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा घेतला तर आम्ही विरोधी बाकावर बसणार आहोत. भाजप कोणता निर्णय घेतो यावरच शिवसेनेची पुढील भूमिका असेल, असेही उद्धव ठाकरे यांनी शेवटी सांगितले.
सत्तेसाठी लाचारी पत्करणार नाही – उद्धव ठाकरे
Date: