श्री भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव सोहळा येत्या रविवारी गोकुळाष्टमीच्या दिवशी ६ सप्टेंबर २०१५ रोजी साजरा होत आहे . त्यानिमित पुणे शहर जिल्ह्यातील मेहेतर बाल्मिकी समाज बांधव भगवान श्री जाहरविर गोगादेव जयंती उत्सवउत्साहात साजरा करतात .
श्री गुरु गोरक्षनाथजींचे शिष्य श्री भगवान वीर गोगादेव , त्यामुळे श्री भगवान वीर गोगादेव यांनी वचन दिले होते कि , जो कोणी निशानाची पूजा मनापासून करेल त्याची सर्व मनोकामना पूर्ण होतील . श्री भगवान वीर गोगादेव यांचे जन्मस्थान राजस्थानमधील गद्रेवा गाव तर राजस्थान मध्येच हनुमानगड येथे समाधीस्थान ( गोगामेढी ) आहे . गोगामेढीमध्ये देखील जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जातो . पुणे शहर जिल्ह्यात पवित्र श्रावण मासाच्या पहिला दिवसापासूनच नागपंचमीपर्यंत सर्व निशानांची स्थापना केली जाते . मेहेतर बाल्मिकी समाज बांधव निशानांची स्थापना करतात . या निशानांची सजावटीमध्ये मोरपीस , शेरा , श्रीफळ , दुपटा वापर करतात . काही निशानामध्ये चांदी , विद्युत रोषणाईनी सजावट करतात . जिथे निशानाची स्थापना केली जाते त्या ठिकाणाला आखाड म्हणतात . या आखाड्यात तीन प्रमुख लोक असतात . यामध्ये निशानाची पूजा करणारा भगत , गोगादेवांची पूजा करणारा , भजन , कीर्तन करणारा खलिपा , निशाण सजविणारा , देखभाल करणारा , निशानाना घेऊन जाणारा सवई घोडे , तर बाकीचे सेवक म्हणून काम करतात . हे सर्व जण व्यसनमुक्त राहून मासांहार व्रज्य करतात . चप्पल न घालणे , केस न कापणे , पांढरे वस्त्र परिधान करणे आदी व्रत नियमाने पाळावे लागतात .
अनेक वर्षापासून निशानाची स्थापना केली जात आहे , पेशवे काळात बसणारे निशानाना पेशव्यांनी ताम्रपट दिल्याची पत्र आहेत . ब्रिटीशकाळातील कागदपत्रे आज देखील आपणास पाहण्यास उपलब्ध आहेत . पुण्यामध्ये मानाचे बसणारे निशाण म्हणजे भवानी पेठ हरकानगरमधील रामलाल भगत निशाण आखाडा , नवा मोदीखाना भागातील अशोक फत्तुजी संघेलिया निशाण आखाडा (लष्कर का राजा ), भवानी पेठ हरका नगरमधील बाराभाई भगत निशाण आखाडा , खडकमाळआळी मधील भगवान भगत निशाण आखाडा , मंगळवार पेठ श्रमिक नगरमधील कैलाश भगत निशाण आखाडा , भवानी पेठमधील हरकानगरमधील गोपाळ भगत निशाण आखाडा आदी मानाचे निशाण समजले जातात . आता पुण्यात एकूण ४० निशाण आहेत . यामध्ये पुणे कॅम्प भागातील निघणारी निशाणाच्या मिरवणुकीत २४ निशाण सहभागी होतात , तर खडकीमधील निघणारी निशाणाच्या मिरवणुकीत १६ निशाण सहभागी होतात .
कोरेगाव पार्क बर्निंग घाट , औंध , पाटील इस्टेट , सदाशिव पेठ , रामटेकडी , वानवडी , हडपसर , घोरपडी गाव , नवा मोदीखाना , हरकानगर , एम जी रोड , ससून कर्मचारी वसाहत , ताडीवाला रोड , खडकमाळआळी , मंगळवार पेठेतील श्रमिक नगर आदी भागातील २४ निशाण पुणे कॅम्प भागातील मिरवणुकीत सहभागी होतात . तर खडकी , पिंपरी- चिंचवड , साप्रस , रेंजहिल्समधील १६ निशाण खडकीमध्ये निघणारी मिरवणुकीत सहभागी होतात . या श्रावणमासात मेहेतर बाल्मिकी समाज बांधव निशान घरोघरी बोलवितात , आपल्या घरी सुख समृद्धी येऊ दे , वीर गोगादेवजीचा आपला कृपा आशीर्वाद मिळू दे हा त्या मागचा उद्देश असतो . त्यालाच ” मिनी बागड ” असे म्हटले जाते . या निशांणाच्या मिनी बागडमध्ये मिरवणूक , भजन कीर्तन , रात्रभर गोगागायन होते यावेळी पारंपारिक डेरू वाद्य व ढोलचा समावेश असतो . यावेळी सर्वासाठी महाप्रसाद दिला जातो .
श्री भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव सोहळाच्या दिवशी सायंकाळी पुणे कॅम्प भागात भव्य मिरवणूक काढली जाते . या मिरवणुकीची सुरुवात नवा मोदीखाना भागातील अशोक फत्तुजी संघेलिया निशाण आखाडा (लष्कर का राजा )ची पूजा करून होते . यावेळी सर्वजाती धर्मातील समाज बांधव सहभागी होतात . शहरातील राजकीय , सामाजिक , धार्मिक , शैक्षणिक मधील मान्यवर व्यक्ती मिरवणुकीत सहभागी होतात . या मिरवणुकीत डॉल्बी , डी. जे. स्पिकर्स नसतो . तर पारंपारिक वाद्य , बंण्ड , ढोली बाजा , ढोल लेझीम , झांज पथकाचा समावेश असतो . हि मिरवणूक नवा मोदीखाना , गुडलक हॉटेल चौक , कुरेशी मस्जिद चौक , सेंटर स्ट्रीट , भोपळे चौक , खरीपेढी , सेटर स्ट्रीट पोलिस चौकी , साचापीर स्ट्रीट , महावीर चौक , महात्मा गांधी रोड , संत नामदेव चौक , मोहम्मद रफी चौक , वीर गोगादेव चौक , १५ ऑगस्ट चौक या मार्गाने सर्व निशानाची मिरवणूक काढून पुलगेट पोलिस चौकीसमोरील गोगामेढी येथे मिरवणुकीची सांगता होते . या मिरवणुकीतील सर्व निशांणाचे पुणे महानगरपालिका , विविध राजकीय पक्ष , सामाजिक संस्था , गणेश मंडळे आदी स्वागतकक्ष उभारून स्वागत करतात . त्यांनतर प्रत्येक निशाण गोरखनाथांच्या स्थानाला पाच फेरी प्रदक्षिणा घालतात . सर्व निशाण गोगामेढीवर विराजमान होतात . त्यानंतर सर्व निशाण प्रमुखांचा पुणे लष्कर बेडा पंचायतच्यावतीने शाल , श्रीफळ देऊन मानसन्मान केला जातो . रात्री बारा वाजता महाआरती होते . यावेळी महाप्रसादाचे देखील आयोजन केले जाते . अशा प्रकारे श्री भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .
या उत्सवाच्या संयोजनासाठी पुणे लष्कर बेडा पंचायत , लक्ष्मण सुसगोहेर , कविराज संघेलिया सुरेश मकवानी , किशोर संघेलिया , विक्रम गोहेर , करण मकवानी , दादा चव्हाण , शैलेन्द्र जाधव , संजय वाघिले , मुकेश चव्हाण , प्रकाश सोलंकी , राजेश सहेरिया , योगेश चव्हाण व मेहेतर बाल्मिकी समाज बांधव परिश्रम घेतात .