मुंबई : पावसाने ओढ दिल्याने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्राचे भविष्य बदलण्याची ताकद असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या मोठ्या प्रमाणावरील कामांमुळे शेततळी, बंधारे भरण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून जलाशयांमुळे भूजल पातळी वाढण्यात मदत होणार आहे. भविष्यातील पाणी व चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास यामुळे निश्चितच मदत होणार आहे.
“मराठवाड्यावर पावसाने कृपा केल्याने मी निसर्गाचे आभार मानतो. असाच दिलासा संपूर्ण राज्याला मिळू दे अशी प्रार्थना करतो. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधलेली शेततळी आणि बंधारे पावसाच्या पाण्याने भरले. ही समाधानाची बाब आहे. ही योजना शाश्वत सिंचनाचा मार्ग निश्चितपणे प्रशस्त करेल”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे. जपान दौऱ्यावर असतानाही राज्यातील परिस्थितीचा ते सातत्याने आढावा घेत आहेत.
यंदा पुरेसा पाऊस न पडल्याने राज्यात टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकरी व प्रशासनाने पाणी व चारा टंचाईबाबत उपाययोजना करण्यास सुरूवात केली होती. मात्र तीन दिवस पावसाने सतत हजेरी लावल्याने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केलेल्या बांधबंदिस्ती, नाला खोलीकरण, ओढ्यांचे सरळीकरण व खोलीकरण यासारख्या कामांमुळे तीनच दिवसात या ठिकाणी पाणी झुळूझुळू लागले आहे. याबरोबरच विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. या अभियानाच्या पहिल्याच वर्षी राज्यात सुमारे 6 हजार गावात एक लाखांहून अधिक कामे झाली आहेत. प्रचंड प्रमाणात लोकसहभाग हे अभियानाचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य ठरले आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे हे अभियान यशस्वितेच्या मार्गावर आहे.
लातूर जिल्ह्यात अगदी काही दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा राहिला होता. मांजरा धरणात केवळ 1.3 दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) पाणी उरले होते. या पावसामुळे ते 3 द.ल.घ.मी. झाले आहे. निम्न तेरणा धरणातून निलंगा शहराला पाणीपुरवठा होतो. तिथे 2 द.ल.घ.मी. पर्यंत पाणी उरले हाते. या पावसामुळे ते 5 द.ल.घ.मी. एवढे झाले आहे. आता शहराला तीन महिने पाणी पुरेल एवढा साठा उपलब्ध झाला आहे. येत्या काही दिवसात असाच पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जेथे कामे झाली आहेत, तेथे पाण्याचा साठा दिसू लागला आहे. पावसाने ओढ दिल्याने पेरण्या उशिरा झाल्या होत्या. हा पाऊस रब्बी पिकांसाठीही उपयुक्त ठरेल, असे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
परभणी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सरासरी 50 मि.मी. पाऊस पडला. जलयुक्त शिवार अंतर्गत तयार झालेल्या साठवणूक नाला, बंधारे यात पाणी साठले आहे. या जिल्ह्यात जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात झालेली असल्यामुळे पावसाचे पाणी जास्त जिरले आहे. कापूस, सोयाबीन तसेच रब्बीतील पिकाला या पावसाचा फायदा होणार आहे. जायगाव, भारसवाडा, झरी, कौडगाव ता. गंगाखेड, चारठाणा या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता राहणार नाही.
उस्मानाबाद जिल्ह्यात तीन दिवस सतत चांगला पाऊस पडला असल्याने सरासरी 36 मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली आहे. कळंब, खर्डा या गावांना टँकरने पाणी देण्याबाबतची मागणी होती. मात्र आता त्याची आवश्यकता राहणार नाही. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून जलयुक्त शिवारातील पाणी साठ्यांमध्येही वाढ झाली आहे.
बीडमधील लघु व मध्यम प्रकल्पातील धरणांमध्ये समाधानकारक पाऊस पडल्याने पाणी साठू लागले आहे. टँकरची संख्या कमी झाली आहे. पाटोदा, गेवराई येथील टँकर बंद करण्यात आले आहेत. या जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 4 हजार कामे हाती घेण्यात आली असून पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाण्याची पातळी वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील खांबेगाव, आंबेसावंगी या जिल्ह्यांना भेट दिली असता त्यावेळी येथील पाणीसाठे कोरडे होते. आता गावातही पाणीसाठा पुरेशा प्रमाणात झाला आहे. विहिरी, नाला यात पाणी भरु लागले आहे. चारा टंचाई जाणवणार नाही असे चित्र निर्माण झाले आहे. येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत 3 हजार 121 कामे पूर्ण झाली असून 457 कामे प्रगतीपथावर आहेत. याशिवाय यापुर्वीच 1 हजार विहिरींच्या पुनर्भरणाचे कामही झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात सरासरी 46 टक्के पाऊस पडल्याने पुरेसा पाणीसाठा निर्माण झाला आहे. पुढचे 10 दिवस असाच पाऊस पडत राहिल्यास जमिनीतील पाण्याचे पुनर्भरण होऊन रब्बी पिकास त्याचा फायदा मिळणार आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत 33 सिमेंट नाला बांधणीचे काम झाले असून समाधानकारक पाणी साठा दिसून येत आहे.