पुणे -कसबा विधानसभा मतदारसंघात असणार्या लालमहालास जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून महत्त्व मिळवून देण्यास माझा प्रयत्न राहणार असून, छत्रपती शिवाजीमहाराजांना आयुष्यभर साथ देणारे सरदार झांबरे, गायकवाड, पासलकर आदींचा वैभवशाली इतिहासही जगापुढे आणणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दीपक मानकर यांनी दिले.
शिवाजीमहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कसबा मतदारसंघात प्रसिद्ध ऐतिहासिक लालमहालाचे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणार्या स्मारकात रूपांतर करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. यामध्ये उपलब्ध जागेचा नेटका वापर करून महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकाचा सचित्र इतिहास पुतळे व म्युरल्सच्या माध्यमातून आपण उभा करणार आहोत, त्याचबरोबर महाराजांच्या जन्मापासून ते स्वराज्य उभारणीपर्यंतच्या काळात त्यांना जीवाभावाची साथ करणारे कसब्यातील शिलेदार ज्यांचा उल्लेख केवळ आज ऐतिहासिक पुस्तकांपुरताच र्मयादित राहिला आहे अशा झांबरे, गायकवाड, पासलकरांबरोबरच शिवा काशिद, जीवा महाले, मदारी मेहतर, बाजीप्रभू देशपांडे आदि मावळ्य़ांच्या स्मृतिदेखील सचित्र स्वरूपात जिवंत करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. लालमहालास लागूनच असलेल्या जागेमध्ये ऐतिहासिक प्रसंगावर आधारित लेझर शोचे आयोजन, बागेचे सुशोभीकरण अशी एक शिवसृष्टीच निर्माण करण्याचा आपला मानस आहे.
यावेळी मानकर यांच्या प्रचारार्थ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये भय्या डाखवे, राजेंद्र कदम, गणेश नलावडे, प्रवीण तरवडे, एकलव्य गुंजाळ, संजय पासरेकर, किरण परदेशी, तात्या कुलकर्णी, सुरेश परदेशी, श्रीमती वनिता जगताप, वंदना नलवडे, देशकर ताई, जयश्री कडबाने, विमल यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
(फोटो साभार – सुशील राठोड )
लालमहालास महत्वपूर्ण पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणार
Date: