कर्जत -श्रीराम पुरोहित, शुभांगी झेमसे आणि लहानगा अमित पवार यांना रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी रायगड भूषण पुरस्कार देण्यात येतात. जेष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी, परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पासून पुरस्कारांना सुरुवात झाली. यंदा हे पुरस्कार राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले
रायगड जिल्ह्याचा इतिहास मोठा आहे. येथील परंपरा, भाविकता, अध्यात्मिकता, परमार्थ तसेच राजकारणही मोठे आहे. रायगडामध्ये नवरत्नांची कमी नाही. नव्या पिढी पुढे चांगले आदर्श ठेवावेवा यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या जिल्ह्यातील नद्या रासायनिक कारखान्याने प्रदूषित होतील, पाणी प्रदूषित होईल परंतु येथील माणसांची मने कधीही प्रदूषित होणार नाहीत, याची मला खात्री आहे असे यावेळी तटकरे यांनी सांगितले .
यंदा या पुरस्कारांचे वितरण कर्जत तालुक्यात आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार सुरेश लाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेशदादा टोकरे, उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पंढरपट्टे, शिक्षण सभापती मनोहर पाशिलकर, समाजकल्याण सभापती गीताताई जाधव, अर्थ व बांधकाम सभापती चित्राताई पाटील, वसंत ओसवाल, सभापती सुवर्णा बांगारे, उपसभापती मनोहर थोरवे आदींसह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.