मुंबई – महाराष्ट्र सरकारने सामान्य जनतेला दिलासा देणारा निर्णय घेतला असून, स्थावर मालमत्ता-जमीन, घर किंवा फ्लॅट आता कोणतेही मुद्रांक शुल्क न भरता आपल्या रक्ताच्या नातलगांना हस्तांतरित केली जाऊ शकते. म्हणजेच आपल्या रक्ताच्या नातेवाईकाला स्थावर मालमत्तेची मालकी हस्तांतरित करताना आता स्टँम्पड्युटी द्यावी लागणार नाही. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी विधानसभेत हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला.
मालकी हक्क राज्य सरकारने ‘महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम प्रचलित नियम‘ या मालकी हस्तांतरणाच्या नियमात बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मालकी हक्क रक्ताच्या नातलगांना हस्तांतरित करण्यासाठी 500रुपयांच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र पुरेसे असल्याचे खडसे यांनी सांगितले.
मुद्रांक शुल्क रद्द करण्याच्या या निर्णयामुळे अवघ्या पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर (स्टँम्प पेपर) आपल्या रक्ताच्या नातलगांची मालमत्ता-जमीन, घर किंवा फ्लॅट हस्तांतरित करता येणार आहे. यापुर्वी रक्ताच्या नातलगांना मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी हस्तांतरणावर पाच टक्के मुद्रांक शुल्क महसूल विभागात जमा करावे लागत होते.