मुंबई –
गेली ५ वर्षे दिमाखाने जोशपूर्ण वातावरणात दुबई, लंडन, सिंगापूर, मकाऊ अशा वेगवेगळ्या शहरांत साजरा झालेला कलर्स मराठी मिक्ता पुरस्कार या वर्षी ऑस्ट्रेलियात होणार असून,याबाबतची घोषणा करताना कलर्स मराठी मिक्तातर्फे दुष्काळग्रस्त शेतक-यांना अभय गाडगीळ यांनी १ कोटीची मदत या वेळी जाहीर केली. या मिक्ता सोहळ्याचे नेतृत्व स्त्रीशक्तीकडे सुपूर्द करण्यात आले आहे. हा सोहळा मेधा मांजरेकर व दीपा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली साजरा होणार असून, महेश मांजरेकर निरीक्षकाच्या भूमिकेत असतील. ट्रॅव्हल पार्टनरची जवाबदारी वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील सांभाळनार आहेत .
या पुरस्कार सोहळ्याची अधिकृत घोषणा एका दिमाखदार समारंभात करण्यात आली. २६ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१६ ला हा सोहळा होणार असून, यंदाचा ‘गर्व महाराष्ट्राचा’ हा पुरस्कार डॉ. डी. वाय पाटील यांना देण्यात येणार आहे.
मनोरंजनासोबतच सामाजिक भान जपण्यावरही कलर्स मराठी मिक्ताचा भर आहे. यंदाची दुष्काळग्रस्त परिस्थिती लक्षात घेता मिक्ताने दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी मदतीचा हात पुढे करत समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी दाखवून दिली आहे. त्याचप्रमाणे रोटरी तर्फेही १ कोटीची मदत करण्यात येईल असे रोटरीच्या पदाधिका-यांनी या वेळेस जाहीर केले. अभय गाडगीळ पुढे म्हणाले गेली ५ वर्षे कलर्स मराठी मिक्ताने करमणुकीसोबतच सामाजिक कार्यसुद्धा केले आहे. गेल्या पाच वर्षामध्ये मिक्ताने क्षितीज या संस्थेस २० लाख रुपयाची मदत केलेली आहे. तसेच इतरही मदत सातत्याने करत आहोत. मिक्ताने केलेल्या सामजिक कार्याची माहिती चंद्रकांत कुलकर्णी यांनी याप्रसंगी उपस्थितीतांना दिली.
कलर्स मराठीचे प्रॉजेक्ट हेड अनुज पोद्दार म्हणाले, “गेल्या वर्षीपासून सुरु झालेला कलर्स मराठी व मिक्ताचा ऋणानुबंध हा केवळ एका सोहळ्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण मराठी मनोरंजन क्षेत्राच्या प्रगतीसाठी उचललेले हे मोठे पाउल आहे. मराठी मनोरंजन क्षेत्राला अधिक प्रगल्भ करून ख-या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी कलर्स मराठी मिक्ता कायम प्रयत्नशील असेल.”
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सहाव्या कलर्स मराठी मिक्ता २०१६च्या घोषणेप्रसंगी उपस्थित होते. ते म्हणाले, “महेशला चित्रपट चांगला कळतो त्यामुळे मीच त्याला सांगितले की या सोहळ्यातून थोडा वेळ काढून चित्रपट निर्मितीवर लक्ष दे, त्याप्रमाणे त्याने ५ वर्षाने मी पुन्हा चित्रपट निर्मितीवर लक्ष देईन असे मला आश्वासन दिले होते. त्यामुळेच यंदाच्या वर्षापासून महेश या सोहळ्याकडे जास्त लक्ष देणार नाही. याचा अर्थ असा नव्हे की त्याला ‘जीवनगौरव’ दिला… त्याचे या सोहळ्याकडे लक्ष हे असेलच.”
कलर्स मराठी मिक्ता पूर्वरंग सोहळा आणि नाट्य महोत्सव २४ ते २७ डिसेंबर २०१५ दरम्यान होणार असल्याचे सुशांत शेलार यांनी सांगितले. नेटके आयोजन, कलाकारांचं आदरातिथ्य, मनोरंजनाचे अनोखे नाविन्यपूर्ण कार्यक्रम या त्रिसूत्रीमुळे ‘कलर्स मराठी मिक्ता’ पुरस्कार सोहळ्यात यंदा नवीन काय असणार याची उत्कंठा सा-यांनाच आहे.