बेकायदेशीर बांधकामामुळे ‘पीएमआरडीए’समोर मोठे आव्हान
पुणे: “पीएमआरडीए च्या विकासासाठी अनेक प्रयत्न सुरु असले तरी त्याच्यासमोर काही मोठी आव्हाने आहेत. त्यातीलच एक म्हणजे बेकायदेशीर बांधकाम.” असे मत पीएमआरडीए चे कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी क्रेडाई-पुणे मेट्रोच्या सर्वसाधारण सभेत व्यक्त केले.
क्रेडाई पुणे मेट्रोची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. ज्यामध्ये पीएमआरडीए चे कार्यकारी अधिकारी महेश झगडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या ३५० हून अधिक सदस्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम सुरु आहेत, जे लवकरात लवकर बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे पीएमआरडीए च्या विकासासाठी येणाऱ्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच बांधकामाची गुणवत्ता आणि बांधकामातील स्थिरता हेदेखील मोठे आव्हान ठरत आहे. आपल्याला स्टॉक मार्केट व गोल्ड मार्केट प्रमाणे धोरणे आखावी लागणार आहेत, त्याचप्रमाणे सर्व भागीदारांनी मनापासून सहभागी होण्याचीही गरज असल्याचे ते या सभेत बोलत होते.
गेल्या दोन दशकांपासून पीएमआर ची झपाट्याने वाढ होत आहे. पीएमआरडीए च्या अंतर्गत काही गावे धरून ६९०० चौरस मीटर म्हणजेच पुण्याचा ७० टक्के लोकसंख्या असलेला भाग येतो. पीएमआरए सिंगापूर, हाँगकाँग सारख्या वि कसित प्रदेशांची प्रतिकृती नसून पीएमआरडीएची एक वेगळी आणि अद्वितीय ओळख असेल, असे झगडे पीएमआरडीए बद्दल बोलताना म्हणाले. त्यासाठी ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील भागीदारांशीही संवाद साधत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
पीएमआरडीए हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी क्रेडाई पुणे मेट्रोची महत्वाची भूमिका असेल त्यासाठी संवाद समितीला सतत भेटण्याची आवश्यकताही असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. क्रेडाई पुणे मेट्रो पीएमआरडीए चे ध्येय साध्य करण्यासाठी संपूर्ण सहाय्य करेल असे आश्वासन क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी यावेळी दिले.
. पीएमआरडीचे खालील काही मुद्य्यांवरील नियोजन…
आर्थिक विकास योजनेसाठी आयटी, फार्मा तसेच अशा अनेक कंपन्यांचे प्रकल्प उभारण्यात येतील. जलसंपत्ती व्यवस्थापनासाठी शास्त्रीय व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. तसेच अंतरराष्ट्रीय निकषांप्रमाणे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवून किमान तेव्हड्या लोकांना पुरेसा जलसाठा उपलब्ध करून देण्याचे ध्येय असेल. पर्यावरण संवर्धनासाठी सायकल व स्थानिक वाहतुकीचा वापर. तसेच आनंदी व शांतताप्रिय आयुष्यासाठी संस्कृती व परंपरेचा विकास अशा काही मुद्द्यांवर सभे मध्ये विस्तृत चर्चा झाली.
