पुणे, दि. २१ (प्रतिनिधी) – ज्योती कुलकर्णी रिसर्च फाऊंडेशनतर्फे कृषी, उद्योग, पर्यावरण या क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणार्या महिलांना येत्या २७ ऑक्टोबरला विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनच्या विश्वस्त भाग्यश्री कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सामाजिक कार्यकर्त्या रेणूताई गावस्कर, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
भाग्यश्री कुलकर्णी म्हणाल्या की, बैदाबाई तांबे यांना ज्योती कृषीकन्या हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ५१ हजार रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. उद्योग क्षेत्रात अद्वितीय कार्य करणार्या मीना बापट, जयश्री वैद्य, सुप्रिया भोसले, कर्मवीर महिला बचत गट यांना ज्योती उद्योगिनी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून प्रत्येकी २५ हजार व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.
निसर्गाची कास धरून पर्यावरण क्षेत्रात विशेष कार्य करणार्या केतकी घाटे व मानसी करंदीकर यांना ज्योती वसुंधरा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अकरा हजार रूपये (विभागून) असे पुरस्काराचे स्वरूप असेल. स्त्रियांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या ज्योती फुलराणी या स्पर्धेतील विजेत्या महिलांनाही यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आश्विनी देशपांडे म्हणाल्या की, डीएसके यांना घडविण्याचे श्रेय स्व. ज्योती कुलकर्णी यांना जाते. आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने स्त्री अबला नाही तर सबला आहे, हे त्यांनी दाखवून दिले होते. डीएसके समूहाच्या पायाभरणीत तसेच यशस्वी वाटचालीत त्यांच्या मोलाचा वाटा आहे. पारंपारिक व आधुनिकतेची योग्य सांगड घालून यश कसे साध्य करता येईल याची उत्तम जाण त्यांना होती. सामाजिक कार्यातही त्यांचा विशेष पुढाकार होता. त्यांच्या या व्यक्तिमत्वाचा खर्या अर्थाने सन्मान व्हावा, या हेतूने त्यांच्या स्मरणार्थ आम्ही हे पुरस्कार मागील वर्षीपासून देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फाऊंडेशनविषयी माहिती देताना तन्वी कुलकर्णी म्हणाल्या की, स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेली संघटना म्हणजे ज्योती रिसर्च फाऊंडेशन. आज आपल्यात अशा असंख्य स्त्रिया आहेत ज्या आपल्या कार्याने इतरांना आधार देत आहेत. अशा स्त्रियांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या हातांना बळ मिळावे, त्यांच्यामध्ये लढावू वृत्ती निर्माण व्हावी या हेतूने ज्योती कुलकर्णी रिसर्च फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. झुंजणार्या, कष्टणार्या स्त्रियांच्या पाठिशी उभी राहणारी संघटना अशी ओळख निर्माण व्हावी, असा आमचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्योती कुलकर्णी फाऊंडेशनतर्फे कर्तुत्ववान महिलांचा होणार सन्मान
Date: