पुणे – शहरात जुलैमध्ये डेंगीचे 75 रुग्ण सापडले असून, गेल्या सहा महिन्यांमध्ये या रोगाचे 113 रुग्ण आढळले आहेत. शहरात गेल्या दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत आहेत. पावसाचे हे पाणी सोसायट्यांच्या, कार्यालयांच्या आवारात पडलेल्या वस्तूंमध्ये साचले जाते. त्यातून डेंगीच्या एडीस इजिप्ती या डासांचा प्रादुर्भाव झाला आहे.
घरातील फ्रिजच्या मागील ट्रेमधील आणि फुलदाणीमधील पाणी, सोसायट्यांमधील छोट्या बागा, गच्चीवर ठेवलेल्या वस्तू आणि कुंड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असून, डेंगीच्या डासांची अंडी सापडल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. पावसाला सुरवात झाल्यानंतर डेंगीचा उद्रेक वाढतो, हा आत्तापर्यंतच अनुभव आहे. जानेवारीपासून आत्तापर्यंत डेंगीच्या रुग्णांची संख्या एक आकडी होती. जुलैअखेरपर्यंत ही संख्या वाढल्याने आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य खात्याने धडक मोहिमा सुरू केल्या आहेत.
“”शहर आणि परिसरात ताप, थंडी आलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. गोळ्या औषधे घेऊनही दोन ते तीन दिवस हा ताप कमी होत नाही. अशा वेळी रुग्णाला रक्ताची चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. अशा रक्ताची चाचणी केलेल्या दहापैकी दोन ते तीन रुग्णांना सध्या डेंगी झाल्याचे निदान होते. त्यानुसार त्यांना पुढील उपचार दिला जातो.‘‘
शहरातील डेंगीच्या रुग्णांची वाढती संख्या
जानेवारी …………… 11
फेब्रुवारी …………… 8
मार्च ………………. 4
एप्रिल .. …………… 1
मे …………………. 3
जून ………………. 11
जुलै ……………….75