‘करवा चौथ’ उपवास करणार नाहीत ‘बिग बी ‘
गेली पाच दशके सिनेरसिकांच्या हृदयसिंहासनावर राज्य करणारे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७२ वा वाढदिवस असून
वाढदिवस आणि ‘करवा चौथ’ असा योग यंदा जुळून आला आहे. ‘करवा चौथ’ हे व्रत उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात ठेवले जाते. खरं तर महिला यादिवशी उपवास करतात. मात्र, बच्चन हेही हा उपवास नित्यनेमाने करत आलेले आहेत. यंदा मात्र बच्चन यांनी उपवास टाळला. याबाबत काही पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ‘डॉक्टरांनी मनाई केल्यामुळे मला उपवास ठेवता आलेला नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपवास करणे शक्य नसले तरी ‘करवा चौथ’ मात्र पारंपारिक ढंगात आणि मोठ्या उत्साहात आमच्याकडे साजरा होत आहे. घरात महिला वर्गाची लगबग सुरू आहे. आम्हीही त्यांच्या आनंदात सामील झालो आहोत. आजचा दिवस ‘फॅमिली’साठीच राखून ठेवलाय.’ अभी तो मै जवान हूं…
अमिताभ यांनी आज केशरी रंगाचा झब्बा घातला होता. या पेहरावात ते अधिकच ‘जिंदादिल’ वाटत होते. ते हेरून एका पत्रकाराने तुमच्या तंदुरूस्तीचं गुपित काय?, असा असा प्रश्न विचारला. तेव्हा स्मितहास्य करत ‘चाहत्यांचं प्रेम आणि स्नेह हेच माझं टॉनिक आहे’, असं उत्तर बिग बी यांनी दिलं. माझी अजूनही काम करण्याची इच्छा आहे. तुमच्या प्रेमामुळे मला नक्कीच तेवढं बळ मिळेल, असेही ते पुढे म्हणाले. चिमुकली आराध्या माझ्यासाठी सर्वात खास अशी भेट आहे, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.