जमील खान दिग्दर्शित ‘ओळख – माय आयडेंटिटी’ या चित्रपटाची पहिली झलक आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत झाला. या निमित्ताने गाण्यातून आणि चित्रपटाच्या फस्ट लुकमधून ‘ओळख’ची उत्सुकता वाढवण्यात कलावंतांनी यश मिळवले आहे. त्यामुळे चित्रपटाची नेमकी कथा काय याची ‘ओळख’ ३१ जुलैला चित्रपटगृहातच होणार आहे.
लहेर एंटरटेनमेंचा हर्षादीप सासन निर्मित, शीतल राजवीर यांची सहनिर्मिती आणि जमील खान दिग्दर्शित ‘ओळख’ हा मराठी चित्रपट ३१ जुलैपासून प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या फस्ट लूक आणि संगीत प्रकाशन सोहळ्याला अलका कुबल-आठल्ये, भूषण पाटील, खुशबू तावडे, अरुण नलावडे आणि गणेश यादव उपस्थित होते.
गीतकार स्वप्नील महालिंग यांच्या गाण्यांना राजेश, कमल आणि प्रणय प्रधान यांनी संगीत दिले आहे. यावेळी प्रणय म्हणाले की, चित्रपटात एकूण दोन गाणी आहेत ज्यात मी प्रिया मोरा जब से.. हे हिंदी गाणं संगीतबध्द केलं आहे, जे हिंदीचे प्रसिध्द गायक मोहंमद इरफान यांनी गायलं आहे, हे खरंतर भावनिक गाणं आहे, नायिकेची भावना व्यक्त करण्यासाठी आम्हाला एक दर्दभरा आवाज हवा होतो, जो हाय स्केलला देखील गाऊ शकेल म्हणून आम्ही मोहंमद इरफानकडून ते गाणं गाऊन घेतलं.. हे गाणं जरा सुफी स्टाईलचं गाणं आहे.
गीतकार स्वप्नील महालिंग सांगतात की चित्रपटात मी विठ्ठला कोसळले मंदिर आणि एक अंगाई गीत आणि एक तांडव गीत लिहिले आहे, विठ्ठला.. हे गीत मराठी फोक गीत आहे, जे आदर्श शिंदे यांनी गायले आहे, ज्यात नायकाने आयुष्यभर पाहिलेले स्वप्न क्षणार्धात हरवते तेव्हा हे गीत चित्रपटात येते. तांडव जे आहे ते व्यक्तिरेखेने शंकराला आपली भावना व्यक्त करण्यासाठी केलेला पयत्न आहे.
दिग्दर्शक जमील खान चित्रपटाबाबत सांगतात की, आपण जन्माला येतो आणि आयुष्यभर आपली ओळख शोधण्याचा आणि सिध्द करण्याचा प्रयत्न करत असतो, असाच आमचा नायक आपली ओळख तयार करण्याचा संघर्ष करत असतो, ज्यात त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो तो प्रवास म्हणजेच ओळख माय आयडेंटिटी चित्रपट होय.
अलका कुबल-आठल्ये एका जबाबदार आणि महत्वाकाक्षी आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. मराठीतला पहिला सिक्स पॅक हिरो म्हणून सध्या चर्चेत असणारा भूषण पाटील या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करतो आहे, तो सांगतो की खरोखरंख अनेकांचे इथे स्वत:ची ओळख निर्माण करण्याचे स्वप्न असते, परंतु मला पदार्पणातच ओळख निर्माण करुन देणारा ओळख-माय आयडेंटिटी याच नावाचा सिनेमा मिळाला आहे. या चित्रपटासाठी मी पोलिस अकादमीत जाऊन रितसर पोलिस ट्रेनिंग घेतले होते, ज्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच पडद्यावर दिसेल आणि विशेष बाब म्हणजे मला या चित्रपटासाठी ६ किलो वजन कमी करावे लागले होते.
खुशबू तावडे या चित्रपटात मुख्य नायिका साकारते आहे..ती सांगते की, चित्रपटात काम करण्याचा अनुभव खूप छान होता, माझ्या व्यक्तिरेखेला दोन शेड आहेत त्याबद्दल आत्ताच सांगण्यात काही अर्थ नाही, चित्रपट पहाल तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईलच.. ३१ जुलैपासून संपुर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.