पुणे : ”प्रत्येकजण आपल्या स्वतंत्र विचाराने स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतो. पण सहजीवनात स्वतंत्र
विचारांना तेवढाच मान दिला तर संसार अधिक छान पद्धतीने फुलतो” अशा गोड शब्दात प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-
टिकेकर यांनी त्यांच्या सुखी संसाराचे रहस्य रसिकांसमोर उलगडले.
गेली ३५ वर्ष कलाकार म्हणून आणि नवरा बायको म्हणून एकमेकांना साथ देत असलेल्या प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर- टिकेकर आणि उदय टिकेकर यांनी त्यांच्या कलाजीवनाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. डी. एस. कुलकर्णी फौंडेशन आयोजित डीएसके गप्पांमध्ये काल राजेश दामले यांनी त्यांची मुलाखत घेतली. राजेश दामले यांनी आपल्या खुमासदार शैलीने या दांपत्याच्या वैवाहिक जीवनाचा प्रवास पुणेकरांसमोर उलगडला.
उदय टिकेकर म्हणाले, ”कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते. आपण त्या व्यक्तीला तिच्यातल्या चांगल्या- वाईट गोष्टींसकट स्वीकारल्याने तिचा आपल्या बद्दलचा आदर वाढतो.”
आरती अंकलीकर- टिकेकर म्हणाल्या ,”आम्ही एकाच प्रकारच्या कलाक्षेत्रात असलो तरी एकमेकांशी स्पर्धा करत
नाही याउलट परस्परांच्या कलेचा आणि त्याच्या विचारांचा स्वीकार करतो. आम्ही परस्परांच्या प्रत्येक कामाचे गुण- दोष
एकमेकांना सांगतो त्यातुनच मग आपले काम अधिकाधिक चांगले कसे होत जाईल याकडे याकडे लक्ष देतो त्यामुळेच आमच्यातील
मैत्रीचं नातं अजूनही कायम आहे.” डी. एस. कुलकर्णी फौंडेशनचे कार्याध्यक्ष श्याम भुर्के यांनी यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.