अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर शिक्षकदिनी चार जणांचा पुण्यात होणार सन्मान
पुणे :
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स, डिझाइन अॅण्ड आर्ट अॅण्ड स्कूल ऑफ आर्ट ’(तएऊअ) च्या वतीने ‘अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार 2015-16’ जाहिर झाले आहेत. पद्मश्री राम मोहन, अॅनिमेशन क्षेत्र (मुंबई), सुभाष पवार, फाईन आर्ट क्षेत्र (पुणे), जयप्रकाश जगताप, फाईन आर्ट क्षेत्र (पुणे), धीमंत व्यास, क्ले मेशन क्षेत्र (मुंबई) या चार जणांना पी.ए. इनामदार (महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष) यांच्या हस्ते अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
शिक्षकदिनी दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते 5 यावेळेत हायटेक हॉल, आझम कॅम्पस येथे हा पुरस्कार गौरव कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य रिषी आचार्य यांनी दिली.
दरवर्षी चार पुरस्कार कला क्षेत्र, ग्राफीक डिझाईन, अॅनिमेशन, व्हिजुअल इफेक्ट्स, स्पेशल ईफेक्ट्स, क्रिएटिव्ह फोटोग्राफी, पेंटींग क्राफ्ट, शिल्पकला, ललित कला, साहित्य, चित्रपट या क्षेत्रातील कलाकार आणि शिक्षकांना देण्यात येणार आहे.
अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार हा भारतातील सर्व महाविद्यालयातील अॅनिमेशन, कला, ललित कला आदी क्षेत्रातील शिक्षकांना विलक्षण योगदान आणि उत्तुंग कामगिरीसाठी देण्यात येतो.