पुणे -मेघावी संस्थेतर्फे आयोजित ‘स्वर सुमन’ कार्यक्रमात यंदा प्रख्यात उपशास्त्रीय गायिका ध्रिती चटर्जी यांच्या उपशास्त्रीय गायनाचा बहारदार कार्यक्रम रविवार दिनांक २६ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता ‘शकुंतला जगन्नाथ शेट्टी ऑडीटोरीयम’, कर्नाटक हायस्कूल, एरंडवणे येथे संपन्न होणार आहे. मुळच्या कलकत्ताच्या आणि आता पुण्यात स्थायिक झालेल्या ध्रिती चटर्जी या ठुमरी आणि दादरा सादर करणार आहेत. त्यांना उमेश पुरोहित (हार्मोनियम) आणि पंडित अरविंद कुमार आझाद (तबला) यांची वाद्य संगत लाभणार आहे.
या कार्यक्रमानंतर प्रख्यात सरोद वादक अनुपम जोशी यांचे सरोद वादन सादर होणार असून पंडित अरविंद कुमार आझाद हे तबल्याची साथ करतील. मेघावी संस्थेच्या या कार्यक्रमास प्रख्यात बासरी वादक पंडित केशव गिंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती पटवर्धन करणार असून हा कार्यक्रम सर्वांना विनामूल्य आहे. मेघावी संस्थेतर्फे सन २००६ पासून उपशास्त्रीय गायन आणि वाद्यसंगीत यांच्या प्रसारासाठी वर्षातून सहा विशेष कार्यक्रमांचे रसिकांसाठी मोफत आयोजन केले जाते.