मुलांच्या बुद्धीक्षमतेविरुद्ध निर्णय लादु नयेत- डॉ. श्रुती पानसे
पुणे : “विविध वयोगटानुसार शरीरासोबत बुद्धीचीदेखील वाढ होते. त्यामुळे त्यांच्या बुद्धीक्षमतेविरुद्ध त्यांच्यावर निर्णय लादु नयेत. त्यांच्या क्षमता ओळखून त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे,” असे मत बाल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेंदू आणि व्यक्ती विकास’ या विषयावर आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर डॉ. श्रुती पानसे बोलत होत्या. मयूर कॉलनीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या सभागृहात झालेल्या या कट्टयावेळी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र. उपस्थित होते.
डॉ. श्रुती पानसे म्हणाल्या, “शरीरासोबत मेंदूचीदेखील वाढ होत असतेआणि सर्वात जास्त स्ट्रेस हा लहान वयोगटात आढळून येतो. त्यामुळे विनाकारण त्यांच्यावर निर्णय लादल्याने किंवा त्यांच्या क्षमतेविरूद्ध जबाबदारी टाकल्याने त्यांच्यातील अस्वस्थता वाढीस लागते. म्हणून पालकांनी देखील काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. मुलांना त्यांच्या बुद्धीनुसार वाढण्यास मदत करणे गरजेचे आहे. आपल्या मेंदूत ‘कॉर्टिसोल’ नावाचे रसायन असते, जे ताण निर्माण करते. तसेच ‘सेरेटोनीन’, ‘इंडोफिन’, ‘ऑक्सिडीसीन’, आणि ‘ट्रियुन’ हे चार आनंदी ठेवणारे रसनदेखील असतात. त्यामुळे कॉर्टिसोल ऐवजी इतर चार रसायनांच्या वाढीसाठी आपण प्रेत केला पाहिजे. मुलांच्या आतील अस्वस्थेतेच्या मुळाशी जाणून घेऊन त्यावर काम केले पाहिजे. मुले लवकरात लवकर मोठे होण्यापेक्षा, योग्य पद्धतीने आणि बुद्धीक्षमतेने कशी होईल या गोष्टीवर भर दिला पाहिजे.”
विनय र.र. यांनीही मनोगत व्यक्त केले.