पुणे- महापालिकेत आज स्थायी समितीच्या 8 पैकी 6 जागांवर भाजपने आपल्या सदस्यांची निवड केली यात काकडे गटाच्या 2 सदस्यांना संधी मिळाली तर बापट गटाच्या एका सदस्याला संधी मिळाल्याने अजूनही काकडे गटाचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या 2018 /19 या वर्षातील 16 सदस्यापैकी आठ स्थायी समिती सदस्यांची मुदत पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज आठ नगरसेवकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये आगामी वर्षासाठी स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील कांबळे आणि हेमंत रासने यांना संधी देण्यात आली आहे.
पुणे महापालिकेतील भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या पक्षाच्या संख्या बळानुसार 16 स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती केली जाते. त्यानुसार 2018 / 19 या वर्षासाठी स्थायी समितीमधील
भाजपचे सुनील कांबळे, मंजुषा नागपुरे, निलिमा खाडे, कविता वैरागे, राजेश बराटे आणि मारुती आबा तुपे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान गटनेते दिलीप बराटे आणि आनंद अलकुंटे या आठ सदस्याचा कार्यकाळ आज संपुष्टात आल्याने त्यांच्या जागेवर 2019 आणि 2020 वर्षासाठी आठ नगरसेवकांची निवड करण्यात आली.
मात्र त्यामध्ये भाजपचे मंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू नगरसेवक सुनील कांबळे यांना पुन्हा संधी देण्यात आली असून भाजपकडून काकडे गटाचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, प्रकाश उर्फ बंडू ढोरे, या दोघांना तर बापट गटाचे दीपक पोटे, आरपीआय च्या हिमाली कांबळे, निष्ठावंत म्हणून हेमंत रासणे यांची निवड भाजपच्या वतीने करण्यात आली .तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक महेंद्र पठारे आणि अशोक कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
तर 5 मार्च होणार्या मुख्य सभेत स्थायी समिती अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक असणार आहे.