आभार मानन्यासाठी आलेल्या कामगारांकडून खासदार काकडेंची अपेक्षा
पुणे : पीएमपीएलच्या इतिहासामध्ये प्रथमच दिवाळीच्या अगोदर कामगारांच्या खात्यामध्ये बोनस जमा झाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कामगारांच्या प्रश्नांसाठी मध्यस्थी केलेल्या खासदार संजय काकडे यांनी कामगारांनी आता पीएमपीएलला नफ्यात आणण्यासाठी काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कामगारांनीही खासदार काकडे यांना याबाबत विश्वास दिला आहे.
दिवाळीपूर्वी बोनस मिळाल्यामुळे यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाल्याची भावना पीएमपीएलच्या कामगारांनी आज व्यक्त केली. कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात खासदार संजय काकडे यांनी मध्यस्थी केल्याने त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी कामगार खासदार काकडेंना भेटले. यावेळी पीएमपीएल कामगार संघटनेचे सुनील नलावडे, माजी नगरसेवक दिनेश धावडे, संघटनेचे उपाध्यक्ष कैलास पासलकर, हरिष अोव्हाळ, राजेंद्र आचार्य, राजाभाऊ पायगुडे, आनंद कदम, बाळासो गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार संजय काकडे यांनी पीएमपीएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांचे विशेष आभार मानले. त्यांच्यामुळेच कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस मिळाला व इतर प्रश्नही मार्गी लागले. आता कामगारांनी पीएमपीएल ला नफ्यात आणण्यासाठी काम करावे. ज्या संस्थेत आपण काम करतो ती संस्था चांगली राहावी व नफ्यात चालावी. तसे झाले तरच, त्यामध्ये काम करणारांचे भवितव्य उज्ज्वल राहू शकते. त्यामुळेच कामगारांची जबाबदारी आता वाढली आहे. याबरोबरच इंटक कामगार संघटनेबरोबरही सकारात्मक चर्चा झाली असून आस्थापना आराखडा मंजूर करण्यासंदर्भात दोन्ही कामगार संघटनांमध्ये एकमत झाले आहे. तसे पत्र त्यांनी गुंडे यांना दिले आहे, असे सांगितले.