‘प्लास्टिकला नाही म्हणा’ संकल्पनेवर आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा
पुणे : ‘प्लास्टिकला नाही म्हणा’ अर्थात ‘गो-ग्रीन से नो टू प्लास्टिक’ या संकल्पनेवर येत्या ५ जानेवारी २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. पुण्यात मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कुलमध्ये सकाळी ९ ते ११ या वेळेत ही स्पर्धा होणार आहे. पुण्यातील सुपरमाईंड फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ युवा, नटराज निकेतन, नागपूर व सामवेद इंटरनॅशनल या संस्थांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सुपारीच्या पानांपासून बनवलेल्या प्लेटवर ही चित्रे काढायची आहेत, अशी माहिती आयोजकांनी नुकतीच दिली.
प्रसिद्ध कार्टूनिस्ट चारुहास पंडित पहिले चित्र काढून स्पर्धेची सुरवात करणार आहेत. आमदार मेधा कुलकर्णी, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडके, ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांच्यासह पुण्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्लास्टिक बंदीबाबत जागृती करण्यासाठी कागदाऐवजी सुपारीच्या पानापासून बनविलेल्या प्लेटवर ही चित्रे काढण्यात येणार आहेत. त्यामुळे ही चित्रकला स्पर्धा जगातील आगळीवेगळी स्पर्धा ठरणार आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांच्यातर्फे या स्पर्धेची विशेष दखल घेण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी येणार्या शालेय विद्यार्थी स्पर्धकांना विनामूल्य प्लेट देण्यात येणार आहेत.
माँटेसरी ते ज्येष्ठ नागरिक या गटातील सर्वजण भाग घेऊ शकतात. ही स्पर्धा भारतामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, मध्यप्रदेश, छत्तीसगड यासह देशातील अनेक प्रमुख शहरांच्या ठिकाणी एकाच वेळी घेण्यात येणार असून, सहभागी होणार्या प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सर्व शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागासाठी प्रोत्साहित करावे व ‘प्लास्टिकचा वापर टाळा व त्या ऐवजी नैसर्गिक घटकांचा वापर करा’ असा संदेश पोहचवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सहभागी शाळांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्तर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी 9049992809/7 या क्रमांकांवर किंवाwww.supermindfoundation. org या संकेतस्थळावर नावनोंदणी करता येईल, अशी माहिती सुपरमाईंड फाउंडेशन संस्थेच्या मंजुषा वैद्य व सामवेद इंटरनॅशनलचे मुकुंद पात्रीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रोटरी क्लब युवाचे श्रीकांत जोशी व सुपरमाईंड फाउंडेशच्या दया कुलकर्णी उपस्थित होत्या.