डॉ. गंगवाल यांना ‘अहिंसा इंटरनॅशनल’तर्फे ‘शाकाहार अहिंसा पुरस्कार’ जाहीर
पुणे : नवी दिल्ली येथील अहिंसा इंटरनॅशनल संस्थेच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा ‘शाकाहार अहिंसा पुरस्कार’ पुण्यातील शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांना जाहीर झाला आहे. रविवार, दि. २ डिसेंबर २०१८ रोजी खारवेल भवन, कुंदकुंद भारती, नवी दिल्ली येथे होणार्या कार्यक्रमात दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या हस्ते व केंद्र सरकारच्या आवास मंत्रालयाचे राजीव जैन यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच परमपूज्य सिद्धांतचक्रवर्ती श्वेतापिच्छाचार्य, श्री १०८ विद्यानंद मुनीराज व श्री १०८ श्रुतसागरजी मुनीराज यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख एक लाख ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. कल्याण गंगवाल यांनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला असून, पुरस्काराची रक्कम झारखंड येथील सम्मेद शिखर परिसरातील आदिवासी पाड्यातील लोकांसाठी वापरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. संगमनेर आणि अकोला तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजासाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्याचे काम डॉ. गंगवाल गेली अनेक वर्षे करीत आहेत. त्याचबरोबर समाजात अहिंसा रुजावी, व्यसनमुक्ती व्हावी आणि पशुबळी विरोधी चळवळ उभारावी, यासाठी डॉ. गंगवाल यांनी व्यापक काम केले आहे.