पुणे : “जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्टातून यशाचा शिखरावर पोहचलेल्या व्यक्तींची चरित्रे मार्ग दाखवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यशस्वीतांची चरित्रे, आत्मचरित्रे वाचायला हवीत. त्यांच्याकडून कठोर परिश्रम, कामातील सचोटी, प्रामाणिकपणा, नेतृत्व कौशल्य आदी गुण आत्मसात करावेत,” असे मत फिनोलेक्सच्या संचालक व मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी व्यक्त केले.
कराची एज्युकेशन सोसायटीच्या बीटी शहानी नवीन हिंद हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक बक्षीस वितरण व स समारंभात रितू छाब्रिया बोलत होत्या. प्रसंगी सोसायटीचे उपाध्यक्ष व विश्वस्त लेफ्टनंट जनरल दीपक अजवानी, विश्वस्त एम. एल. भंबानी, सचिव दीपक रमनानी, सदस्य अरुणा जेठवानी, चित्रेश भाटिया, यश कामदार, वरिष्ठ पत्रकार विनोद रोहानी, नवहिंद हायस्कूलचे प्राचार्य सुरेश पेशवानी आदी उपस्थित होते.
रितू छाब्रिया म्हणाल्या, “प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अंगभूत कलागुण असतात. पालक-शिक्षकांनी त्यांच्यातील कलागुण ओळखून त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. समाजाप्रती आपण देणे लागतो या भावनेतून काम केले पाहिजे. मुकुल माधव फाऊंडेशनच्या माध्यमातून हे काम आम्ही करतो आहोत, याचे समाधान आहे.”
शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांना छाब्रिया यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी फिनोलेक्सचे संस्थापक प्रल्हाद छाब्रिया यांच्या जीवनावर सादर केलेल्या नाटिकेने उपस्थितांची वाहवा मिळवली. दीपक अजवानी, एम. एल. भंबानी यांनी मार्गदर्शन केले. सुरेश पेशवानी यांनी प्रास्ताविक केले.