पुणे : धुम्रपान करणाऱ्यांसह त्याच्या आसपासच्या प्रत्येकाला धुम्रपानाचे दुष्परिणाम भोगावे लागतात. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी असून जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयात येत्या पंधरा दिवसात ‘धुम्रपान निषिध्द क्षेत्र’चे फलक दर्शनी जागेत लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मौखिक आरोग्य सप्ताहानिमित्त ‘तंबाखूचे दुष्परिणाम व तंबाखू नियंत्रण कायदा’ या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक संजय देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी डॉ. जोशी, उपस्थित होती.
जिल्हाधिकारी राव म्हणाले, तंबाखूमुळे अनेक मौखिक आजारांना सामोरे जावे लागते. तंबाखू मुक्तीसाठी समाजाच्या सर्व स्तरात प्रबोधन होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये तसेच महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला बंदी आहे. त्याची कडक अंमलबजावणी सर्वत्र होणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालयांच्या परिसराबरोबच शासकीय कार्यालयेही तंबाखू मुक्त करण्याच्या दृष्टीने तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
जिल्हा रुग्णालयाच्या दंत विभाग प्रमुख डॉ. सुहासिनी घाणेकर यांनी तंबाखूचे दुष्परिणाम, मुख कर्करोग, तंबाखू नियंत्रण कायदा व उपाय याविषयी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली.
या बैठकीला पुणे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विकास दांगट, शिक्षण विभागाचे एच. आय.आतार, जे.व्ही. चव्हाळे, शिक्षण विस्तार अधिकारी सहदेव आव्हाड, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.