पुणे-आगामी विधानसभा निवडणुकीत शहरातील विधानसभा मतदारसंघातील इच्छुक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मुलाखती आज, मंगळवारी दिवसभर काँग्रेस भवन येथे सुरु आहेत. शहरातील विधानसभा मतदारसंघासाठी माजी खासदार जयवंतराव आवळे आणि प्रदेश पदाधिकारी राजेश शर्मा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी काँग्रेसकडून ५३ जणांनी अर्ज केले होते. सर्व मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम प्रदेश काँग्रेसने निश्चित केला. त्यानुसार, आज मंगळवारी सकाळी ११ पासून सायंकाळी सहापर्यंत इच्छुकांच्या मुलाखती सुरु झाल्या. या मुलाखतींची सुरुवात पिंपरी-चिंचवडमधील मतदारसंघांपासून झाली आहे. त्यानंतर, पुणे कँटोन्मेंट, शिवाजीनगर, पर्वती, वडगावशेरी, कोथरूड, हडपसर आणि कसबा पेठ अशा क्रमाने मुलाखती घेण्यात येत आहेत. प्रदेश काँग्रेसने नियुक्त केलेल्या निरीक्षकांसह शहरातील पदाधिकाऱ्यांच्या निवड समितीकडून या सर्व मुलाखती घेण्यात येत आहे.
शहरातील आठ मतदारसंघांपैकी शिवाजीनगर आणि कसबा या दोन मतदारसंघातील इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. या दोन्ही मतदारसंघातून प्रत्येकी १२ कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त केला आहे. कोथरूड आणि पर्वती या दोन मतदारसंघातील इच्छुकांची संख्या सर्वांत कमी आहे. या मतदारसंघांतून केवळ तीनच इच्छुकांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे, इच्छुकांची संख्या कमी असलेल्या मतदारसंघातील मुलाखती केवळ अर्ध्या तासात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तर, शिवाजीनगर, कसबा पेठ आणि पुणे कँटोन्मेंट या मतदारसंघांतील मुलाखतींसाठी एक तास राखीव ठेवण्यात आला आहे.