डॉ. बाबासाहेब म्हणजे विश्वाला लाभलेली महान देणगी : बापट
पुणे: “राज्यघटनेचे शिल्पकार अशा विशिष्ट चौकटीत ठेवून डॉ. आंबेडकरांना समाजासमोर जे आणले जाते, ते अन्यायकारक आहे. आंबेडकरांनी भविष्यचा वेध घेत राष्ट्राच्या उभारणीकडे पाहिले. अशा या महामानवाचे कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठी आजही प्रेरणादायी ठरेल, असेच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या विश्वाला लाभलेली महान देणगी आहे,” अशा शब्दांत महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आदरभाव व्यक्त केला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहारातील विविध भागात झालेल्या कार्यक्रमांमध्ये गिरीश बापट आवर्जून आपली उपस्थिती नोंदविली. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक अजय खेडेकर, उमेश गायकवाड, प्रियांका श्रीगिरी, रुपाली बिडकर,अतुल गायकवाड, शहर अध्यक्ष योगेश गोगावले, आरपीआयचे शहर अध्यक्ष अशोक कांबळे, परशुराम वाडेकर, मंदार जोशी, शैलेंद्र बिडकर, दिलीप गिरीमकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बापट म्हणाले की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर कायदेपंडित, तत्वज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. भारताला सामाजिक दृष्ट्या मजबूत करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आपल्या आयुष्यातील आचार आणि विचार यांची सांगड घालून आपल्या तत्वज्ञानाला त्यांनी कृतीची जोड दिली आणि राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वातून ती जगासमोर मांडली. अशा महापुरुषाची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करताना त्यांच्या कार्यातून आपण प्रेरणा घ्यायला हवी.’
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या विविध कार्यक्रमात बापट सहभागी झाले. यामध्ये बी. जे. मेडिकल कॉलेज तसेच कॅम्पमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर सम्यक ट्रस्ट पुणे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या लाडू वाटप उपक्रमातही ते सहभागी झाले. दांडेकर पुलाजवळील विवेकानंद तरुण मंडळ तसेच अजिंक्य तरुण मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या बाबासाहेबांच्या प्रतिकृतीला त्यांनी अभिवादन केले. तर लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घराची प्रतिकृतीचेही यावेळी बापट यांच्या हस्ते उदघाटन झाले.