पुणे:
पुणे-दौंड व दौंड-पुणे दरम्यान डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) रेल्वेची यशस्वी चाचणी मंगळवारी (दि. 17) करण्यात आली. मंगळवारी सकाळी 7 वाजून 37 मिनिटांनी या 10 डबे असलेल्या डेमू रेल्वेने पुणे स्थानक सोडले व दौंडला 9 वाजून 50 मिनिटांनी ती पोहोचली. परतीच्या प्रवासात सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी तिने दौंड स्थानक सोडले व दुपारी 12.15 वाजता ती पुणे रेल्वे स्थानकात पोहोचली.
अनेक तांत्रिक बाबी या चाचणीदरम्यान तपासण्यात आल्या. फलाटांची उंची, रेल्वे किती वेळ स्थानकात थांबविण्यात यावी, प्रवाशांना रेल्वेचा जिना चढ-उतार करण्यास येणार्या अडचणी, आदी बाबी या चाचणीदरम्यान तपासण्यात आल्या. दरम्यान, डेमूची चाचणी यशस्वी झाल्यामुळे ती फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत सुरु करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सुरुवातीला याच्या 12 फेर्या (पुणे-दौंड 6 व दौंड-पुणे 6) सुरु करण्याचा विचार असल्याची माहिती असून याचा तिकिटदर उपनगरी गाड्यांप्रमाणेच (लोकलचा दर) असणार आहे. चढ-उतार करण्यास जिने असल्यामुळे थेऊर, कुंजीरवाडी, मांजरी, मुंढवा, भारत फोर्ज, मगरपट्टा सिटी, अशा लहान स्थानकांवर देखील ही रेल्वे थांबविण्यात येवू शकते.
विद्युतीकरणानंतरही डेमूच धावणार ?
पुणे-दौंड दरम्यान विद्युतीकरण होऊन तब्बल चार महिने उलटले आहेत. या मार्गावर लोकल (मेन लाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) धावू शकेल, या हेतूने लाखो रुपये खर्च करुन विद्युतीकरण करण्यात आले. मात्र तरीदेखील तांत्रिक कारण दाखवून डिझेलवर धावणारी डेमू रेल्वेच या मार्गावर धावण्याचे जवळपास निश्चित झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
डेमू रेल्वे केवळ पुणे-दौंड मार्गावर न सोडता ती खंडाळा ते दौंड मार्गावर सोडण्यात यावी. म्हणजे दीडशे किलोमीटर अंतरावरील या पट्ट्यातील लोकांना याचा लाभ घेता येईल. आणखी विलंब न करता ती लवकरात लवकर सुरु करण्यात यावी.
-हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप