पुणे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे 1 जानेवारी पासून राज्यामध्ये धान्य वितरणासाठी ई-पिओएस प्रणाली सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गंत सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पीओएस मशिन देण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत पुणे शहरासाठी दोन बायोमेट्रिक ई-पीओएस मशिन देण्यात आल्या होत्या. सार्थक महिला बचत गट व सत्यज्योती सावित्रीबाई फुले महिला बचत गट या दोन स्वस्त धान्य दूकानांना या ई-पीओएस मशीन पुरविण्यात येऊन ई-पिओएसद्वारे धान्य वितरण करण्यासाठी इंटरनेट जोडणी देण्यात आली होती.
अन्नधान्य वितरण अधिकारी शहाजी पवार, सहाय्यक अन्नधान्य वितरण अधिकारी रणजित देसाई, सहाय्यक अन्नधान्य वितरण अधिकारी शांताराम सांगडे, ब विभागाचे परिमंडळ अधिकारी दांडगे, लाभार्थी व परिसरातील नागरिक यांच्या उपस्थितीत सदरील स्वस्त धान्य दुकानांमधुन ई-पिओएस प्रणालीद्वारे ई-पीओएस मशीनचा वापर करुन एकुण दहा लाभार्थ्यांना गहू व तांदूळाचे वाटप यशस्वीरित्या करण्यात आले. हे धान्य वाटप कॅशलेस पध्तीने करण्यात आले आहे. सदरची ई-पिओएस प्रणाली जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित करण्यात आली असून या व्यवहारांची माहिती http://dhaanyapurti.nic.in/FpsSales/MH या संकेत स्थळावर उपलब्ध आहे असे अन्न धान्य वितरण अधिकारी शहाजी पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.