स्त्री स्वातंत्र्यासाठीचा महात्मा फुले यांचा लढा मोठा – उपमहापौर धेंडे
पुणे- महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्री स्वातंत्र्यासाठी तसेच त्यांच्या शिक्षणासाठी दिलेला लढा मोठा आहे. त्यांच्या या लढ्यामुळे आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात सर्वाच्च पदावर विराजमान होऊ शकली, त्यांच्या प्रती कृतद्नता व्यक्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर डाॅक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी करून कुमार आहेर यांनी ही संविधान भूमी निर्माण केली तसेच ते मनापासून फुले यांचे एकपात्री करून समाजाचे खऱ्या अर्थाने प्रबोधन करतात या बद्दल अभिनंदन केले . धेंडे आणि अमेरिका स्थायिक उद्योजक चेतन सराफ यांच्या हस्ते कात्रज येथील प्रती महात्मा फुले वाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे उद्घाटन 72 व्या स्वातंत्रदिनी करण्यात आले यावेळी तेथे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्यांचे अनावरण शिक्षिका बीना बुनगे व राजेश बुनगे या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले. सदर पुतळे माळी आवाज संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार लडकत यांनी प्रती फुलेवाड्यास भेट म्हणून दिले आहेत.
याप्रसंगी बोलताना चेतन सराफ यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख महात्मा फुले यांनी प्रथम आपल्या पोवाड्यामधून करुन दिली. आम्ही अमेरिकेत असलो तरी हा पोवाडा आजही वाचला की महाराजांच्या विविध पैलूंचे दर्शन आम्हाला घडते. त्यामुळे आज या सभागृहाचे उद्घाटन करताना महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांचेही अनावरण होत आहे हा एक चांगला योग आहे.
बीना बुनगे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, आज मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे ते केवळ महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कृपेमुळे.त्यांनी जर स्त्री शिक्षणासाठी लढा दिला नसता तर आज आम्ही महिला चूल आणि मूल यातच गुरफटून गेलो असतो. समताधिष्ठित समाजरचनेचे महात्मा फुलेंचे स्वप्न होते ते स्वप्न साकारण्यासाठी या प्रति फुलेवाड्यातून अनेक सामाजिक चळवळी निर्माण झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी विजयकुमार लडकत, संतोष शिंदे,विष्णू गरूड, माजी नगरसेवक हरिश्चंद्र दांगट, निर्मला वनशिव यांचीही भाषणे झाली.
प्रास्तविकात कुमार आहेर यांनी या वाड्याच्या निर्मिती मागची भूमिका स्पष्ट करून फुलेंना अभिप्रेत असलेले समाज कार्य येथे करीत असतो असे म्हंटले.सूत्रसंचालन हनुमंत टिळेकर यांनी केले. रघुनाथ ढोक यांनी आभार मानले अॅड. तेजल आहेर यांनी स्वागत केले
या कार्यक्रमासाठी विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या प्रसंगी लघुपट, गौतमी आहेर दिग्दर्शित स्रियांवरील अत्याचार ही एकांकिका सादर करून अभिनेत्री स्वप्ना दुर्वे हिच्या अभिनयाने लोकांचे डोळे भरून आले पुढे नृत्य असे अनेक बहारदार कार्यक्रम झाले. परिसरातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौतमी आहेर गौरव आहेर, आकाश ढोक, आशा ढोक, रागिणी लडकत आदींनी विशेष परिश्रम घेतले.