गिरीश बापट यांच्या प्रचाराची दुसरी फेरी पूर्ण-शहराध्यक्ष योगेश गोगावले
पुणे- रविवारच्या सुट्टीचा दिवस साधून पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ १९४४ बूथपैकी बहुतांश कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन परिचय पत्रकांचे वाटप केले. ‘एक दिवस बूथसाठी’ या अभियानाअंतर्गत उद्या संध्याकाळपर्यंत सर्व बूथमध्ये पत्रक वाटप पूर्ण होणार आहे. या अभियानाद्वारे महायुतीच्या प्रचाराची दुसरी फेरी पूर्ण झाली असून मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी आज पत्रकार परिषदेत केली. शिवसेनेचे प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र शिंदे आणि आरपीआयचे प्रसिद्धी प्रमुख ऍड. मंदार जोशी यांची उपस्थिती होती.
श्री. गोगावले म्हणाले, ‘दुसर्या टप्प्यात सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये दुसरी प्रचार फेरी पूर्ण झाली. पथनाट्य, व्हिडिओ रथ, कोपरा सभांद्वारे मतदारसंघ ढवळून काढण्यात आला. महिला, युवक, अल्पसंख्यांक , भटक्या विमुक्त जमाती, वाल्मिकी समाज, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी आदी मेळाव्यांचे आयोजन केले होते. विविध समाजघटकांनी बापट यांना पाठिंबा जाहीर केला.’
श्री. गोगावले पुढे म्हणाले, ‘पुढील टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, पंकजा मुंडे, विनय सहस्रबुद्धे यांच्या जाहीर सभा होणार आहेत. महायुतीचा जाहीरनामा येत्या बुधवारी जाहीर केला जाणार आहे. मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत शोधता यावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. १६ एप्रिलपासून मतदारांना घरोघरी जाऊन स्लिपांचे वाटप केले जाणार आहे.’