स्त्री सक्षमीकरणाच्या आजच्या काळात महिलांसाठी एक विशेष व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने पाऊल उचलत झी मराठीने जागृती हा उपक्रम काही दिवसांपूर्वी सुरू केला. मुंबईसह विविध शहरांमध्ये आणि गावांमध्ये जागृतीचे अनेक कार्यक्रम झाले ज्यात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी जागृतीच्या सभासद महिलांना मार्गदर्शनही केले याशिवाय वेगळी वाट धरत करीअरचे नवे पर्याय स्वीकारणा-या, सामाजिक क्षेत्रांत योगदान देणा-या महिलांच्या कार्याचा आढावाही यात घेण्यात आला. याच उपक्रमाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर जावी या विचारातून आता अशाच काही खास महिलांची भेट होणार आहे झी मराठीच्या आम्ही सारे खवय्ये जागृती स्पेशल भागांमधून. मार्च महिन्यातील दर शुक्रवारी हे खास भाग दुपारी १.३० वा. प्रसारित होतील. याची सुरूवात ४ मार्चपासून होणार असून या भागात लघु उद्योजिका गार्गी भंडारी सहभागी होणार आहेत. बॅग आणि पर्स बनविण्याच्या लघु उद्योगांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचं कार्य गार्गी भंडारी करतात. याशिवाय ८ मार्चला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणा-या स्नेहा कडलक सावंत यांच्यासोबतच्या गप्पा आणि विशेष पदार्थांची मेजवानीही यात बघायला मिळेल. या जागृती विशेष भागांचं निवेदन जागृतीची ब्रॅंड अम्बॅसिडर असलेली लोकप्रिय अभिनेत्री अमृता सुभाष करणार आहे.
महिला दिनाच्या या विशेष भागानंतर ११ मार्चला मंगल पवार यांच्या कार्याचा आढावा घेणारा विशेष भाग प्रसारित होणार आहे. महिला मंडळ आणि बचतगटाच्या माध्यमातून स्त्री सक्षमीकरणाचे काम करणा-या मंगलताई त्यांच्या सामाजिक कार्याविषयीची आणि जीवनप्रवासाविषयीची माहिती सागंणार आहेत. इमेज कन्सलटंट सारख्या वेगळ्या क्षेत्राची वाट चोखंदळणा-या मानसी लाल सावंत यांच्यासोबतच्या गप्पा १८ मार्चला प्रसारित होणा-या भागात रंगणार आहेत. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य करणा-या मुक्ता पुणतांबेकर यासुद्धा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा भाग २५ मार्चला प्रसारित होणार आहे.
दिवसागणिक बदलत जाणा-या या समाज व्यवस्थेत स्त्रीचं स्थानही बदलतंय, अनेक नवनव्या जबाबदा-या पेलतांना ती दिसतेय. तिच्या याच बदलांची गरज समजून घेऊन त्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम ‘झी मराठी जागृती’ या उपक्रमामधून होत आहे. साथ स्वतःला स्वतःची हे ब्रीदवाक्य असलेल्या या उपक्रमांतर्गत विविध शहरांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच उपक्रमाचा हा महत्त्वाचा भाग असलेले ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमाचे हे विशेष भागही महिला प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच ज्ञानार्जनाचं कामही करतील.