‘सरगम’ हा अत्यंत वेगळ्या धाटणीचा संगीतमय शो आहे . महाराष्ट्राचे आवडते संगीतकार , गायक , त्यांची आवडती आणि सुपरहिट गाणी एका नव्या रंगात – ढंगात आणि एका नव्या स्वरूपात , सरगम या कार्यक्रमाद्वारे युवावर १ मार्च पासून दर बुधवार आणि गुरुवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत . प्रेक्षकांसाठी हि एक संगीतमय पर्वणी आहे जी त्यांना त्यांच्या घरात बसून अनुभवायला मिळेल . या संगीतमय प्रवासाचा पहिला भाग , शंकर महादेवन या दिग्गज संगीतकाराच्या सुमधुर संगीताने सुरु होईल. या कार्यक्रमात शंकरजी गणपती नमन ,सूर निरागस हो , परमेश्वरम , या रे इलाही , पर्वतदिगार , बगळ्यांची माळ अरुणिकिरणी , ब्रेथलेस हि आणि अशी अनेक गाजलेली गाणी आपल्याला एका वेगळ्या तालासुरात अनुभवायला मिळतील. त्यांची दोन्ही मुले सिद्धार्थ महादेवन आणि शिवम महादेवन हेही या कार्यक्रमात त्यांना साथ देत आहेत . राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे हे सुद्धा या भागात शंकर महादेवन यांच्याबरोबर गाणार आहेत .
मराठी संगीत ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आपल्या संस्कृतीत ते अत्यंत खोलवर भिनलेले आहे. ह्याच मराठी संगीत संस्कृतीचा वारसा जपत झी युवा एक नवा कोरा संगीतमय शो घेऊन येत आहे. अनेक दिग्गज संगीतकार आणि गायक यांची एक संगीतमय बहारदार मेजवानी असणार आहे . लोक गीते , फोक संगीत , नाट्य संगीत जुनी गाजलेली गाणी , त्यांचे आजच्या काळातील तंत्रज्ञानाने बनवलेली नवीन रूप , संगीत क्षेत्रातील नवीन टॅलेंटचा शोध , जुन्या गाण्यांना आजच्या संगीतमय मंडळींनी दिलेली मानवंदना असं बरच काही या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे . या कर्यक्रमाद्वारे संगीत क्षेत्रातील दिग्गज लोकांचा संगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला पहायला मिळेल . त्याचबरोबर संगीत क्षेत्रातील शिष्य त्यांच्या गुरूंना एक आदरांजली देणार आहेत . झी युवाच्या या शो द्वारे संपूर्ण मराठी संगीत इंडस्ट्री एका प्लॅटफॉर्म वर पहायला मिळणे हि एक संगीतमय पर्वणीच आहे .त्याच प्रमाणे अनेक नवोदित कलाकारांना पहिल्यांदा मोठ्या प्लॅटफॉर्मवर स्वतःला सिद्ध करण्याची संधीसुद्धा मिळणार आहे .
बवेश जानवलेकर , बिझिनेस हेड – झी युवा आणि झी टॉकीज यांच्या म्हणण्याप्रमाणे , “सरगम ” ह्या कार्यक्रमात अनेक दिग्गज संगीत कलाकार त्यांची वैविध्यपूर्ण प्रतिभा दाखवणार आहेत. अश्या प्रकारचा वेगळा संगीतमय कार्यक्रम आजपर्यंत मराठी वाहिनीवर दाखवण्यात आलेला नाही . संगीत कलाकाराला संगीतमुग्ध करणारा आणि संगीताबरोबर प्रेक्षकांसमोर एक वेगळाच ऑरा निर्माण करणारा कार्यक्रमाचा अतिभव्य सेट हे ही या कार्यक्रमाचं वैशिठ्य आहे . हा मानाचा तुरा झी युवाच्या शिरपेचात खोवण्यात झी युवाच्या टीम ला यश आले आहे
मराठी चित्रपटसृष्टीत यश मिळविल्यानंतर अभिनेत्री उर्मिला कोठारे आता छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. सरगम या कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची जवाबदारी उर्मिला कोठारे यांनी उचलली आहे . उर्मिलाचा मराठीतला छोट्या पडद्यावरचा हा पहिलाच शो असणार आहे. आदिनाथ कोठारे या कार्यक्रमाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि निर्माते आहेत . हा कार्यक्रम दर बुधवार आणि गुरवार रात्री ९ वाजता झी युवावर पाहता येईल.