‘शेगावीचा योगी गजानन’ झी टॉकीज वर
रसिकांची अभिरुची लक्षात घेत नानविध मनोरंजक चित्रपटांची मेजवानी देणार झी टॉकीज आता रसिकांना आध्यात्मिक अनुभूतीचा आनंद मिळवून देणार आहे. रविवार २२ मे ला ‘शेगावीचा योगी गजानन’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमिअर झी टॉकीज वर दुपारी १२.०० वा. व सायं. ६.०० वा प्रसारित केला जाणार आहे.
‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ असे म्हटले जाते, शेगावचे श्री गजानन महाराजही त्यापैकीच एक संत. त्यांची ख्याती सर्वदूर आहे. भक्तांची संकटे दूर करून त्यांना परमेश्वराचे दर्शन घडवून देण्याची शेकडो उदाहरणे त्यांच्या चरित्रात सामील आहेत. त्यांच्या कृपाप्रसादाने अनेकांचे जीवन सुखकर झाले आहे. आजमितीला महाराष्ट्रात गजानन महाराजांचे असंख्य भक्तगण आहेत. या भक्तगणांसाठी ‘शेगावीचा योगी गजानन’ हा भक्तीमय चित्रपट झी टॉकीजची अनोखी भेटच आहे.
गजानन महाराजांच्या महात्म्यावर आधारलेल्या या चित्रपटात ‘गजानन लीला’ पहाता येणार आहे. ‘गजानन विजय’ या गजानन महाराजांच्या चरित्र ग्रंथात भक्तांनी अनुभवलेल्या विविध चमत्कारांचे वर्णन आहे. या चरित्र ग्रंथाच्या आधारेच हा चित्रपट बनवण्यात आला आहे. गजानन महाराजांची भूमिका नागपूरचे हुरहुन्नरी कलावंत मुकुंद वसुले यांनी साकारली असून या चित्रपटात जॅकी श्रॉफ, मिलिंद गुणाजी, भारत गणेशपुरे, संजय खापरे, प्रेमा किरण, दिपाली सय्यद, पूनम विनेकर आदि कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
प्रसारण रविवार २२ मे दुपारी १२.०० वा. आणि सायं ६.०० वा. झी टॉकीजवर