विलयम शेक्सपिअरच्या गाजलेल्या शोकांतिकांवरून प्रेरित होऊन साहित्यऋषि वि. वा. शिरवाडकर यांनी नटसम्राट हे नाटक लिहिलं. ७०च्या दशकात या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास रचला. आजवर यशवंत दत्त, सतीश दुभाषी, दत्ता भट, श्रीराम लागू, उपेंद्र दाते यांनी गणपतरावांची व्यक्तिरेखा साकारली.
‘नटसम्राट’च्या रूपाने झी मराठी वाहिनीने एक अजरामर नाट्यकृती पुन्हा रंगभूमीवर आणली. ‘कोणी घर देत का घर?’ अशी आर्त साद देत हिंडणाऱ्या अप्पासाहेब बेलवणकरांच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेते मोहन जोशी प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि प्रेक्षकांचा या नाट्यकृतीला भरगोस प्रतिसाद मिळाला. नाट्यगृहाबाहेर हाउसफुलची पाटी असणं यात काहीच शंकाच नव्हती. प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळालेली ही यशस्वी नाट्यकृती आता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. येत्या रविवारी २१ जुलै रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षक या अजरामर नाट्यकृतीचा आस्वाद घेऊ शकतात.