27 नोव्हेंबरपासून सोम-शनि. संध्या. 6 वाजता ‘जाडूबाई जोरात’ प्रसारित करण्यात येईल.
गेली 18 वर्ष सतत नाविन्यपूर्ण मनोरंजनाने जगभरातील मराठी प्रेक्षकांना झी मराठी वाहिनीने भुरळ पाडली आहे. मराठी
दूरचित्रवाणी क्षेत्रातील पहिली दैनंदिन मालिका ‘आभाळमाया’ असो वा मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला
जाणारा ‘झी गौरव पुरस्कार’ असो, किंवा जग पादाक्रांत करणारा ‘चला हवा येऊ द्या’ सारखा धमाल कार्यक्रम असो! झी
मराठी वाहिनीने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची भूक नेहमीच भागवली आहे. धकाधकीच्या जीवनात जेवढी दगदग वाढतेय
तेवढीच ही मनोरंजनाची भूक वाढत चालली आहे. रसिकांची हीच गरज लक्षात घेऊन झी मराठीने संध्याकाळी
मनोरंजनाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 27 नोव्हेंबरपासून दुपारी 1 वाजता प्रक्षेपित होणारी ‘जाडूबाई
जोरात’ही मालिका संध्याकाळी 6 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. दररोज संध्याकाळी 6.30 वाजता होम
मिनिस्टरपासून सुरु होणाऱ्या या मनोरंजनाच्या यात्रेचा शुभारंभ आता संध्याकाळी 6 वाजल्यापासून ‘जाडूबाई’; अगदी
जोरात करतील.
वेगवेगळ्या विषयांचं कल्पक सादरीकरण हे झी मराठी वाहिनीचं वैशिष्ट्य!’जाडूबाई जोरात’ ही मालिका याचं उत्तम
उदाहरण! निर्मिती सावंत आणि किशोरी शहाणे अशा दोन दिग्गज अभिनेत्रीच्या अभिनयाची जुगलबंदी सध्या चांगलीच
रंगात आली आहे. मालिकेने सुरुवातीपासूनच रसिकांच्या मनाची पकड घेतली होती. नव्या वेळेत मालिकेची हीच पकड
आता अधिक घट्ट होईल, अशी आशा मालिकेची टीम व्यक्त करत आहे.
जाडबाईने जरी डाएटचा मार्ग स्वीकारला असला तरी प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा हा खुराक कधीही कमी होणार नाही, याची
प्राइम टाईम वाढवून झी मराठीने पुरेपूर काळजी घेतली आहे. 27 नोव्हेंबरपासून संध्या. 6 ते रात्री 11 हा संध्याकाळपासून
सुरु होणारा प्राइम टाईमचा प्रवास प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी ठरेल.

