बालपण म्हटलं की डोळ्यांसमोर सर्वात आधी येतात ते शाळेचे दिवस.. शाळेत वर्गमित्रांसोबत केलेलेी धम्माल.. शाळेबाहेरची उनाडगिरी, शाळेच्या किंवा शिकवणीच्या वाटेवरची सायकलची रेस या आणि अशा किती तरी आठवणी मनात डोकावून जातात. या आठवणींसोबत पुन्हा एकदा भेट करवून देण्याचं काम मागच्या वर्षी आलेल्या ‘किल्ला’ या मराठी चित्रपटाने केलं होतं. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह राष्ट्रीय पुरस्कारावरही आपली मोहोर उमटवणा-या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समिक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी या चित्रपटाची आणि यातील बाल कलाकारांची स्तुती केली होती. लहानग्यांचं तरल भावविश्व मांडणारा हा चित्रपट बालपणीच्या आठवणी ताज्या करण्यासाठी पहिल्यांदाच झी मराठीवरून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. येत्या २९ मे ला रविवारी झी मराठीवर ‘किल्ला’ या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर होणार असून तो प्रेक्षकांना दुपारी १२ , ४ आणि संध्याकाळी ७ वा. बघता येणार आहे.
‘किल्ला’ची कथा आहे चिन्मय उर्फ चिनूची. आईच्या नोकरीतील बदलीमुळे पुण्यातून कोकणात आलेल्या चिनूला नवी जागा आणि नव्या वातावरणाशी जुळवून घेणं अवघड जातंय ज्यामुळे त्याचं एकाकीपण वाढतंय. अशातच त्याची मैत्री शाळेतील काही उनाड मुलांशी होते. ‘बॅक बेंचर्स’ असलेल्या या मुलांचं स्वतःचं असं वेगळं विश्व आहे ज्यामध्ये चिनूही नकळत सामील होतो. शाळेत चालणारी धम्माल मजा मस्ती आणि शाळेबाहेरही फुलत जाणा-या या मैत्रीने चिनूचंही मन तिथे रमायला लागतं. त्याच्या याच प्रवासाची कथा म्हणजे ‘किल्ला’ हा चित्रपट.
बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असो की भारतातील गोव्यात रंगणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या सर्वांवर आपली ठसठशीत मोहोर उमटवण्यात ‘किल्ला’ यशस्वी झाला होता. यासोबतच मागील वर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांतही किल्लाने विविध पुरस्कार प्राप्त केले होते. कोकणातील निसर्ग सौंदर्य आपल्या छायाचित्रणातून अद्भुतपणे टिपण्याचं काम या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि छायालेखक अविनाश अरूण यांनी केलं होतं. या छायाचित्रणाचं समिक्षकांनी आणि प्रेक्षकांनी विशेष कौतुकही केलं होतं.
आपल्या आईच्या सततच्या होणा-या नोकरीतील बदल्यांमुळे दरवेळी नव्या जागेशी जुळवुन घेतांना होणा-या चिनूची घालमेल आणि यातून बाहेर पडण्यासाठी त्याला वर्गमित्रांची मिळालेली सोबत, त्यांची घट्ट होत जाणारी मैत्री आणि पुढे एका वळणावर त्यातही येणारा दुरावा अशी गोष्ट या चित्रपटाची आहे. चित्रपटात अमृता सुभाष, अर्चित देवधर, पार्थ भालेराव, गौरीश गावडे आणि अथर्व उपासनी हे कलाकार मुख्य भुमिकेत आहेत.
पुन्हा एकदा बालपणीच्या आठवणींची शाळा भरवणारा आणि सध्या जे बालवयात आहेत अशांना आपलासा वाटणारा हा ‘किल्ला’ येत्या २९ मे ला झी मराठीच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.


