पुणे-तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावाखाली मानवी संवाद हरवत चालला आहे. अशा काळामध्ये माणसामधील माणूसपण जपण्यासाठी विविध कलांची मदत घेणे गरजेचे असल्याची बाब बुधवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अधोरेखित झाली. ‘युवास्पंदन’ महोत्सव त्यासाठीचा एक कल्पक आविष्कारच ठरणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
‘युवास्पंदन’ या ३४ व्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ युवक महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी विद्यापीठाच्या आवारात झाले. महोत्सवासाठी उभारलेल्या पु. ल. देशपांडे मुख्य सभामंडपामध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राजदत्त उद्घाटक म्हणून, तर सिनेअभिनेता गिरीश कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भारतीय विद्यापीठ महासंघाचे सहसचिव डेव्हिड सॅम्प्सन, महोत्सवाचे निरीक्षक डॉ. सुरिंदर मोहन कांत, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखा अधिकारी अतुल पाटणकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि महोत्सवाच्या मुख्य आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. विलास उगले, डॉ. महेश अबाळे आणि आयोजन समितीचे सचिव डॉ. प्रभाकर देसाई या वेळी उपस्थित होते.
राजदत्त म्हणाले, ‘कला ही व्यक्ती व समाजाला आनंद देणारी बाब असते. समाजाला एकत्र आणण्याचे काम कलेच्या माध्यमातून होत असते. युवास्पंदन महोत्सवाच्या निमित्तानेही हेच अनुभवायला मिळत आहे. कोणत्याही कलेला पूर्णत्व नसते, याची जाणीव ठेवणारा कलावंत हा जिवंत असतो. या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनीही हे जाणून घ्यावे.’ या महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधील ऊर्जेने प्रभावित होण्याची एक संधी मिळाल्याचे मत कुलकर्णी यांनी मांडले. कुलकर्णी म्हणाले, ‘शिक्षणामधून कलेकडे दुर्लक्ष होत असताना, कलेचा जाणीवपूर्वक विचार करण्याचे काम अशा महोत्सवांमधून होत असते. युवकांसाठी हा काळ नवनिर्मितीचा काळ असतो. अशा महोत्सवांमधून युवकांनी कलेद्वारे स्वतःचा शोध घेण्याची गरज आहे. त्या आधारे मिळणाऱ्या संवेदना एकमेकांना तसेच समाजाला समजून घेण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. त्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.’ कुलगुरू डॉ. करमळकर यांनी आपल्या विद्यार्थी जीवनामधील आठवणींना उजाळा देताना विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठीचे कलेचे महत्त्व अधोरेखित केले. केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे, तर शिक्षकांनीही कलेमध्ये रुची वाढवावी, असे आवाहनही त्यांनी केले. पुणे हे सांस्कृतिक राजधानीचे शहर असल्याने महोत्सवासाठी आलेल्या परराज्यातील विद्यार्थ्यांचे स्वागत करतानाच, त्यांना या संस्कृतीची ओळख करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पांडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. देसाई यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. डॉ. चाकणे यांनी आभार मानले.

