लखनऊ-उत्तर प्रदेश भाजपने273 जागांवर आघाडी घेतल्याने भाजपचा विजय निश्चित झाला आहे. योगी आदित्यनाथ भाजपच्या लखनऊ कार्यालयात पोहोचले. त्यांनी येथे गुलालाची जोरदार उधळण केली.योगी म्हणाले, उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. संपूर्ण देशाच्या आणि जगाच्या नजरा विशेषतः उत्तर प्रदेशकडे लागल्या होत्या. आज उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्ष आणि भाजपच्या मित्रपक्षांना प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्याबद्दल उत्तर प्रदेशातील जनतेचे मनःपूर्वक आभार. बंधू आणि भगिनींनो, 7 टप्प्यांत पहिल्यांदाच उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मतमोजणीचा भ्रामक प्रचार सुरू होता. उत्तर प्रदेशातील जनतेच्या शक्तीने त्या भ्रामक प्रचाराचा धुव्वा उडवला आणि भाजपला विजयी केले.उत्तर प्रदेशात सुशासनासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला पंतप्रधानांचे सहकार्य आणि दिशा मिळाली आहे. आज सर्वांच्या सहकार्याने भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे आणि देशातील सर्वात मोठ्या राज्यात मिळाले आहे. हे बहुमत म्हणजे भाजपच्या राष्ट्रवाद, विकास आणि सुशासनाच्या मॉडेलला उत्तर प्रदेशातील जनतेचा आशीर्वाद आहे. सबका साथ – सबका विकास – सबका विश्वास – सबका प्रयासाने आम्ही पुढे जाऊ.
बहुमताचा आकडा : 202
एकूण जागा : 403
उत्तर प्रदेश निवडणूक निकाल/ट्रेंड अपडेट्स…
| पक्ष | आघाडी | विजय |
| भाजप | 273 | 50 |
| सपा | 125 | 07 |
| काँग्रेस | 01 | 01 |
| बसपा | 01 | 00 |
| इतर | 01 | 01 |
- प्रतापगडमधील रामपूर खास मतदारसंघातून काँग्रेसच्या आराधना मिश्रा विजयी झाल्या आहेत. यूपीमध्ये काँग्रेसची ही पहिलीच जागा आहे, ज्यावर त्यांनी विजय मिळवला आहे.
- प्रतापगडच्या बाबागंज विधानसभा मतदारसंघातून राजा भैय्या यांच्या जनसत्ता दलाचे विनोद कुमार विजयी झाले आहेत.
- बहराइच जिल्ह्यातील नानपारा विधानसभा मतदारसंघातून अपना दलाचे राम निवास वर्मा विजयी झाले आहेत.
- रायबरेली सदर मतदारसंघातून आदिती सिंह ९ हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. राहुल आणि प्रियंका या दोघांनीही या जागेवर प्रचार केला होता. असे असतानाही काँग्रेसला आपला बालेकिल्ला वाचवता आला नाही.
- मेरठच्या सरधना मतदारसंघातून भाजपचे संगीत सोम पराभूत झाले आहेत.
- करहलमधून अखिलेश यादव, तर जसवंत नगरमधून त्यांचे काका शिवपाल यादव विजयी झाले आहेत. या विजयापूर्वी अखिलेश यांनी ट्विट केले होते – इम्तिहान बाकी है हौसलों का, वक्त आ गया है फैसलों का.
दिग्गजांचे बालेकिल्ले भुईसपाट
निवडणुकीपूर्वी अखिलेश यादवांसोबत गेलेले स्वामी प्रसाद मौर्य फाजीलनगरमध्ये पराभूत झाले. टीईटी पेपर लीकमुळे घेरलेले योगींचे मंत्री सतीश द्विवेदी यांना सिद्धार्थनगरची इटावा जागा जिंकता आली नाही. कैराना येथेही भाजपचा पराभव झाला, जिथे सपाच्या नाहिद हसन विजयी झाल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय सिंह लल्लू यांचा कुशीनगरमध्ये पराभव झाला.

