पुणे : सर्वांगीण विकासासाठी कंपनी व्यवस्थापन व मनुष्यबळ यांची सकारात्मक मानसिकता आवश्यक आहे, असे मत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड ऍग्रीकल्चरचे महासंचालक डॉ.अनंत सरदेशमुख यांनी व्यक्त केले. ते बुधवारी एमसीसीआयएच्या सुमंत मुळगांवकर सभागृहात आयोजित ‘हंगामी मनुष्यबळ – फायदे आणि तोटे’ या विषयावरील एमसीसीआयए,एनआयपीएम व आयएसटीडी एच.आर.फोरमच्या परिसंवादात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, वस्त्र निर्मिती उद्योगात सुरवातीला बदली कामगार ही संकल्पना गिरणीकामगारांनी अनुभवली. आता सध्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) व इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) यासारख्या नवीन बदलांमुळे संपूर्ण उद्योगविश्वात मोठ्या प्रमाणात बदल पहावयास मिळतील असे असताना हंगामी मनुष्यबळाचा रोजगारावरही निश्चित परिणाम होईल.
या परिसंवादात सुरवातीला भारत फोर्ज कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. एस. व्ही. भावे यांनी आपल्या मनोगतात कामगार कायद्यांमधील कायम व हंगामी स्वरूपाच्या कामगारांसंबंधीच्या नियमांविषयी सविस्तर विवेचन केले.तसेच एकीकडे उद्योगजगताची व्यवसाय वृद्धी कायम असण्याची शक्यता नसताना दुसरीकडे कंपनी व्यवस्थापन सर्वच कामगारांना नोकरीवर कायम करण्याची भूमिका कशी काय घेऊ शकते असा सवाल केला.
तर नॅशनल इन्स्टिटूयट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) चे पुणे विभागाचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात मनुष्यबळाविषयी कंपनी व्यवस्थापनानेही आपला दृष्टिकोन सकारात्मक करणे गरजेचे आहे असे सांगितले व केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या ‘नीम’ योजनेद्वारे बेरोजगार युवकांना रोजगारक्षम बनण्याची संधी मिळत असल्याचे सांगितले. भारत फोर्ज, टाटा मोटर्स, महिंद्रा एन्ड महिंद्रा यासारख्या कंपन्यांमधून हंगामी कामगारांना मिळणारी वागणूक ही अनेकांनी अनुकरण करण्यायोग्य असल्याचे सांगितले. शिका व कमवा आणि नीम सारख्या योजनांमुळे एकीकडे बेरोजगार युवकांना रोजगार संधी उपलब्ध होत असतानाच प्रत्यक्ष कामाच्या अनुभवासोबतच तांत्रिक शिक्षण मिळत असल्याने त्यांना सुरक्षित भविष्याची हमी मिळते. मात्र संपूर्ण देशात युवावर्गात श्रम प्रतिष्ठेविषयी अनास्था असल्याने कामाच्या असंख्य संधी उपलब्ध असतानाही केवळ अमुक प्रकारचेच काम करेन या अट्टाहासापायी हजारो लाखो उच्च् शिक्षित तरुण आज बेरोजगार असल्याचे दिसत आहे अशी खंत व्यक्त केली.
या कार्यक्रमात व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यानी उद्योगजगताशी संबंधित विषयावरील नाट्यछटांचे सादरीकरण केले. यामध्ये बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थ्यानी सादर केलेल्या नाट्यछटेला प्रथम तर आयआयसीएमआर च्या विद्यार्थ्यानी सादर केलेल्या नाट्यछटेला व्दितीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर पंप्स कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापक तृप्ती देसाई यांनी सूत्रसंचालन अनुजा देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन इंडियन सोसायटी ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेन्टच्या अध्यक्ष रश्मी हेबळकर यांनी केले.
या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील विविध कंपन्यांचे मनुष्यबळ व्यवस्थापक उपस्थित होते.

